

अमरावती: (Traffic Police)खासगी मोबाईलने वाहनांचे फोटो काढण्यास वाहतूक पोलिसांना मनाई आहे; पण अनेक पोलिस त्याचे उल्लंघन करताना दिसतात. आता अशा पोलिसांवर कारवाई करण्यात येणार आहे.
खासगी मोबाईलने वाहनांचे फोटो काढणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश दोन वर्षांपूर्वी राज्याच्या अप्पर पोलिस महासंचालकांनी दिले होते; मात्र त्या सूचनेचा वाहतूक पोलिसांना विसर पडल्याचे चित्र आहे.
मुंबईत सिग्नलवर पोलिस मोबाईलवरून फोटो काढताना दिसतात. वाहतूक पोलिसांना ई-चलन मशीन दिलेली असतानादेखील सर्रास मोबाईलने वाहनांचे फोटो काढले जातात. बऱ्याचदा नियम मोडणाऱ्यांना कारवाई कशासाठी होत आहे, हे कळतसुद्धा नाही. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांनी मोबाईलमध्ये टिपल्यानंतर त्यांच्या घरीच दंडाचे चलन पाठवले जाते. आता नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करताना, त्या गाड्यांचे खासगी मोबाईलमधून फोटो काढणे वाहतूक पोलिसांना महागात पडणार आहे.
त्यामुळे यापुढे वाहनचालकांवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांना ई-चलन मशीनचाच वापर करावा लागणार आहे. वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करताना पोलिस स्वतःच्या खासगी मोबाईलवर वाहनाचा फोटो वा चित्रीकरण करून काही कालावधीनंतर ई-चलन मशीनमध्ये फोटो अपलोड करतात, तसेच गाडीचे संपूर्ण फोटो न टाकता फक्त नंबर प्लेटचे फोटो टाकतात. त्यामुळे गाडी कोणती आहे, हे ओळखणे कठीण होते. यापुढे गाडीचा संपूर्ण फोटो काढणे बंधनकारक असणार आहे.
वाहतूक पोलिसांना कारवाई करताना स्वतःच्या खासगी मोबाईलवर वाहनाचा फोटो काढण्यास मनाई आहे. मोबाईलवर वाहनाचा फोटो काढताना आढळल्यास कारवाई करण्यात येईल. त्याबाबत वाहनचालकांनी तक्रार करावी.
– एम. रामकुमार, अप्पर पोलिस आयुक्त (वाहतूक)