वीज तारेचा स्पर्श, चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

0

 चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील ब्रम्हपुरी  तालुक्यातील (Bramhapuri) गणेशपुर गावात शेतात काम करत असताना वीज प्रवाहित तारेचा स्पर्श झाल्याने चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून शेतकऱ्यांच्या कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये पुंडलिक मानकर, प्रकाश राऊत, युवराज डोंगरे, नानाजी राऊत यांचा समावेश आहे. या घटनेत एक शेतकरी गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांनी सकाळी शेतीच्या कामासाठी शेतात प्रवेश केला असता ही दुर्घटना घडली. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे विद्युत तारा तुटून शेतात पडून राहिल्या होत्या. या तारेच्या स्पर्शामुळे विद्युत प्रवाहामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. वीज केंद्राचे अधिकारी घटनास्थळी पोहचले असून, चौकशी सुरू आहे. वन्यप्राणी, विशेषतः रानडुक्करांच्या बंदोबस्तासाठी शेताच्या कुंपणात वीज पुरवण्याचा प्रकार घडला आहे का, याचीही चौकशी होणार असल्याचे समजते.

या घटनेबाबत चंद्रपूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले असून तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, मृतक शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शक्य तितकी मदत देण्याचे आश्वासनही दिले आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील या दु:खद घटनेबाबत संवेदना व्यक्त केल्या आहेत आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या घटनेने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण केले असून विद्युत सुरक्षेबाबत अधिक दक्षता घेण्याची मागणीही जोर धरत आहे.