१८ मे रोजीच्या दिवसभरातील घडामोडी

0

MVA महाराष्ट्रात 46 जागा जिंकेल
काँग्रेस अध्यक्ष खरगे यांचा मोठा दावा

महाराष्ट्रात महाविकास आघाडी लोकसभेच्या 48 पैकी 46 जागा जिंकणार असल्याचा महत्त्वपूर्ण दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी इंडिया आघाडीच्या मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केला. महाराष्ट्रात आम्हाला किमान 46 जागा मिळतील असे वातावरण आहे. महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईत झाली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेच महाविकास आघाडीला महाराष्ट्रात किती जागा मिळणार याबाबत या तिनही नेत्यांनी तिन वेगवेगळे आकडे सांगितले. पण आकडे जरी वेगवेगळे असले तरी महाराष्ट्र कोणाच्या पारड्यात वजन टाकणार हे या तिनही नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

पाचव्या टप्प्यासाठी प्रचार थंडावणार
२० मे रोजी होणार मतदान

लोकसभेच्या पाचव्या टप्प्प्यातील प्रचार आज संध्याकाळी थंडावणार आहे. मात्र प्रचार जरी थंडावणार असला तरी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या सभांनंतर राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या 13 लोकसभेच्या जागांवर 20 मे ला मतदार होणार आहे. या मतदार संघातला प्रचार आज शनिवारी थंडावणार आहे. पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातला 13 लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे. या मुंबईतल्या सहा लोकसभा मतदार संघात सह ठाणे, पालघर, कल्याण आणि भिवंडी या लोकसभा मतदार संघांचाही समावेश आहे. शिवाय नाशिक दिंडोरी आणि धुळे या मतदार संघातही मतदान होणार आहे.

भाविकांनी भरलेल्या बसमध्ये अग्नितांडव
8 जणांचा होरपळून मृत्यू; 24 हून अधिक जखमी

भाविकांनी भरलेल्या बसला आग लागून भीषण दुर्घटना घडली आहे. पोलीस अधीक्षक नरेंद्र बिजारणिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अग्नितांडवामध्ये आठ जणांचे होरपळून मृत्यू झाला आहे. तर 24 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. हरियाणातील कुंडली मानेसर पलवल एक्सप्रेस वेवरील ही घटना आहे. जखमींना शहरातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये एकूण 60 भाविक होते. धावत्या बसला आग लागल्याचे पाहून स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि दुर्घटनेची माहिती त्यांनी तातडीने पोलिसांनाही दिली.

विदर्भात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज

राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज

राज्यातील काही भागात कडक ऊन तर काही भागात दुपारनंतर ढगाळ वातावरणासह वादळी पाऊस पडत आहे. हवामान विभागाने पुढील ५ दिवस विदर्भासह राज्यातील इतर काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिला. हवामान विभागाने कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, नगर आणि नाशिक तसेच खानदेश, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात काही भागात विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला. तर विदर्भातील बुलडणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा वाशीम, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिला. उद्यापासून पुढील पाच ५ दिवस विदर्भात काही ठिकाणी विजा आणि वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागातही वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान आणि काही भागात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.

डब्यातून अचानक निघाला धूर
प्रवाशी भीतीने ट्रकवर उतरले

गोदान एक्स्प्रेसच्या डब्यातून अचानक धूर निघू लागल्याने प्रवाशांची धावपळ पाहायला मिळाली. इगतपुरीच्या मुंढेगावजवळ ही घटना घडली आहे. डब्यातून धूर निघत असल्याचं निदर्शनात आल्यानंतर प्रवाशांनी ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. त्यामुळे काही काळ याठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेनंतर गोदान एक्स्प्रेस बराच वेळ मुंडेगावाजवळ उभी होती. अनेक प्रवाशी भीतीने ट्रकवर उतरले. रेल्वेतील कर्मचाऱ्यांना खाली उतरुन धूर निघत असलेल्या ठिकाणी फायर एक्सटिंग्युशरचा फवारा मारला. अखेर धूर निघणे बंद झाल्यानंतर गाडी पुढे रवाना झाली. गाडी इगतपुरी स्थानकात पोहोचताच डब्याचा लायनर दुरुस्त करण्यात आला. त्यामुळे गाडी मुंबईच्या दिशेने रवाना झाली.

 

अमोल किर्तीकर भाजपमध्ये जातील
आंबेडकर यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकर हे भारतीय जनता पक्षासोबत जातील, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते मुंबईतील गोरेगाव येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार परमेश्वर रणशुर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारादरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी हा दावा केला आहे. मात्र, प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे.

रिपाइंला एकही जागा मिळाली नाही
पण मला कॅबिनेट मिळणार – रामदास आठवले

लोकसभा निवडणूकीत मी महायुतीकडे दोन जागा मागितल्या होत्या. मात्र, शिर्डीला सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आल्याने ही जागा देण्यात आली नाही. मात्र, मला राज्यसभेत संधी मिळणारच आहे, आणि यावेळी मला कॅबीनेट मंत्रीपद देण्यात येणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेत्यांनी दिल्याचा दावा रिपाई आठवले गटाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. नाशिक दौऱ्यावर महायुतीच्या प्रचारासाठी आलेल्या रामदास आठवले यांनी नाशिकमध्ये आले होते, त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

 

विभव कुमारला मुख्यमंत्र्यांच्या घरातून अटक

खासदार स्वात मालीवाल मारहाण प्रकरण

स्वाती मालीवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी आरोपी विभव कुमार याला आज, शनिवारी अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरातून ताब्यात घेतले आहे. विभवला अटक करण्यासाठी दिल्ली पोलीस त्याच्या लोकेशनचा सतत तपास करत होते. राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना 13 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मारहाण झाली होती. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपी विभव कुमारला अटक केली आहे. विभवला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाहून ताब्यात घेण्यात आले. तेथून पोलिसांनी त्याला सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात नेले.

हार्दिक पांड्यावर एका मॅचची बंदी
स्लो ओव्हर रेट प्रकरण

मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जाएंटस मॅचदरम्यान स्लो ओव्हर रेट प्रकरणी बीसीसीआयने हार्दिक पांड्यावर कारवाई केली आहे. बीसीसीआयने हार्दिक पांड्यावर एका मॅचची बंदी घालण्यात आली आहे. तसेच 30 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. सामन्यातील शिष्ठाचार मोडल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. बीसीसीआयने हार्दिक पांड्यासह मुंबईच्या इतर खेळाडूंवर कारवाई केल्याची माहिती मिळतेय. मुंबईकडून तिसऱ्यांदा अशा प्रकारची चूक झाली. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

सात जणांशी लग्न करणाऱ्या दुल्हनाला दणका
अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला

सोशल मीडिया साईट्सवर ओळख करीत सात जणांशी लग्न करून त्यांना लाखो रुपयांनी फसविणाऱ्या ‘लुटेरी दुल्हन’ला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका दिला आहे. तिने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळत इतर तिघांचा अर्ज मात्र मंजूर केला. समीरा फातिमा वल्द मुक्तार अहमदसह आई रेहाना जमाल, काका मौसिन अन्सारी, त्यांची पत्नी निखत फरझाना, हरीश, वसीम, वसीम शेख अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी न्यायमूर्ती ऊर्मिला जोशी फलके यांच्या समक्ष सुनावणी झाली. गिट्टीखदान परिसरातातील प्रॉपर्टीचा व्यवसाय करणाऱ्या तक्रारदारास फेसबुकद्वारे रिक्वेस्ट पाठवत तिने आपल्या जाळ्यात ओढले. एका हॉटेलमध्ये बोलावत त्याच्यासोबत अश्लील फोटो काढले. त्यानंतर, समीरा फातिमाने व्हिडिओ आणि फोटोद्वारे ब्लॅकमेलिंग करीत त्यांना लग्नासाठी गळ घातली. नकार दिल्यावर थेट नातेवाइकांसोबत घरी येऊन तमाशा केला व जबरदस्तीने लग्न करण्यासही भाग पाडले. काहीच दिवसात तिच्यासह नातेवाईक प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागू लागले. शिवाय सातत्याने फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत, दहा लाखांनी लुबाडले.

जेवणावरून पत्नीसोबत कडाक्याचे भांडण
विहिरीमध्ये ढकलून पत्नीची हत्या
पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना अमरावती जिल्ह्यात घडली आहे. क्षुल्लक वादाचे रुपांतर थेट हत्याकांडमध्ये झाल्याने परिसरामध्येही खळबळ उडाली आहे. पतीने पत्नीला काठीने बेदम मारहाण करत मरणासन्न अवस्थेमध्ये विहिरीमध्ये ढकलून तिची हत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. शिरजगाव कसबा ठाण्याच्या हद्दीतील खरपी शिवारामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शारदा विनोद युवने (वय 37 वर्ष) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिचा पती विनोद सम्मू युवने (वय 33 वर्ष) या अटक करण्यात आली आहे.

विधानसभेच्या 288 जागा लढवणार
मनोज जरांगे यांनी दिला इशारा

आपल्या मागण्या मान्य होत नसल्याने अखेर मनोज जरांगे पाटील यांनी शेवटचं हत्यार उपसलं आहे. लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली. कोणत्याही राजकीय पक्षांना पाठिंबा दिला नाही. मात्र, आता त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सगे सोयऱ्यांना आरक्षण देण्याची अंमलबजावणी झाली नाही तर मी विधानसभेच्या 288 जागा लढवणार आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे. मनोज जरांगे यांच्या या मोठ्या घोषणेमुळे राजकीय पक्षांना घाम फुटणार असल्याचं बोललं जात आहे.

—————-
मेट्रो सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सायकल चोराला पकडले

सीसीटीव्हीच्या मदतीने चोराला धरले

मागील ३ महिन्यापासून झांसी राणी चौक मेट्रो स्टेशन ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन दरम्यान सायकल चोरीच्या अनेक घटना आढळून आल्या स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये एकच व्यक्ती या सर्व घटनांमध्ये आढळून आल्याचे निदर्शनास आले. चोराला पकडण्याकरिता महा मेट्रोच्या वतीने मोहीम राबविण्यात आली. दिनांक १३ मे रोजी सदर व्यक्ती पुनः एकदा ऍक्वा लाईन मार्गिकेवरील बंसी नगर मेट्रो स्टेशन येथे रचना रिंग रोड मेट्रो स्टेशन कडे जाणाऱ्या मेट्रो ट्रेन मध्ये निदर्शनास आला बंसी नगर मेट्रो स्टेशन येथे कार्यरत सुरक्षा रक्षक अक्षय तागडे यांनी रचना रिंग रोड मेट्रो स्टेशन येथे कार्यरत स्टेशन कंट्रोलर अभिजित ठोकल,सुरक्षा रक्षक आणि स्टेशन परिसरातील कर्मचाऱ्यांना अवगत केले असता सदर व्यक्तीला रचना रिंग रोड मेट्रो स्टेशन येथे ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली चौकशी दरम्यान त्याने चोरी केल्याची कबुली देत त्याचे नाव भगवान दास करिया असल्याचे सांगितले. पुढील कार्यवाही करिता सदर आरोपीला एमआयडीसी पोलीस स्टेशनला सुपूर्द करत आयपीसी कलम ५११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला व चोरीला गेलेल्या सायकल जप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.मेट्रो कर्मचाऱ्याच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
——————

मालिवाल यांना मारहाण प्रकरणी व्हिडीओ मिळाल्याचा दावा
केजरीवाल प्रचार सोडून पंजाब हून दिल्लीला रवाना

आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवण्यासाठी तीस हजारी न्यायालयात पोहोचल्या आहेत. सीआरपीसी कलम 164 अंतर्गत त्यांचा जबाब नोंदवला जाईल. याआधी गुरुवारी रात्री 11 वाजता दिल्ली पोलीस आप खासदार स्वाती मालीवाल यांच्यासोबत एम्समध्ये पोहोचले होते. जिथे त्यांचे मेडिकल झाले. काल त्यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी बिभव कुमार यांच्या नावाचा एफआयआरमध्ये समावेश आहे.

ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांना पुन्हा मारहाण
शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधवच्या कार्यकर्त्यांवर आरोप
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्या अयोध्या पौळ यांना पुन्हा एकदा मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. शिवसेनेच्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी घरात शिरून मारहाण केल्याचा आरोप अयोध्या पौळ यांनी केला आहे.

मनोज जरांगे यांची प्रकृती अचानक बिघडली
संभाजीनगर जिल्ह्यातील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खराब झाली आहे. त्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गॅलेक्सी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासून आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

छगन भुजबळांच्या नाराजीची चर्चा
मंत्री गिरीश महाजन तातडीने भुजबळ फार्मवर
नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ नाराज झाल्याची चर्चा रंगली आहे. त्यांच्या नाराजीची बातमी फुटताच भाजपचे संकटमोचक म्हणवले जाणारे मंत्री गिरीश महाजन  तातडीने भुजबळ फार्मवर पोहोचले. दोन्ही नेत्यांत बराच वेळ चर्चा झाल्याची माहिती आहे.

शरद पवार यांच्याशी सुनील तटकरेंची भेट
माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा
नाशिक लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी आलेले शरद पवार नाशिकमधील एका हॉटेलमध्ये मुक्कामी थांबले होते. त्या हॉटेलमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे येऊन गेले असा दावा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे  राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

RSS चा कार्यकर्ता विकास वर्ग सुरू
वर्गाचा समारोप १० जून रोजी

आजपासून नागपूरच्या रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ‘कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय’चा शुभारंभ झाला आहे. यावेळी सहसरकार्यवाह डॉ. कृष्णगोपालजी, अ. भा. सेवा प्रमुख तसेच वर्गाचे पालक अधिकारी पराग अभ्यंकर तसेच वर्ग सर्वाधिकारी इकबाल सिंहजी उपस्थित आहेत. वर्गाचा समारोप १० जून २०२४ रोजी होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयचा शुभारंभ शुक्रवारी सकाळी रेशीमबागस्थित डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात झाला. वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना अ. भा. सेवा प्रमुख पराग अभ्यंकर यांनी रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांना संघटित हिंदू समाजाची जागतिक दृष्टी निर्माण व्हावी, असे आवाहन केले.

दारुड्या मुलाने केला बापाचा खून
जळगाव जिल्ह्यातील घटना
जामनेर तालुक्यातील पळासखेडा बु. येथे दारु पिण्यासाठी पैशांची मागणी करणा-या मुलाने बापाला तीक्ष्ण हत्याराने वार करुन खून केल्याची घटना घडली आहे. पळासखेडा बु. येथील खासगी नोकरीवर ड्रायव्हर म्हणून काम करणारे बाजिराव राजाराम पवार वय (५५) हे आपल्या पत्नी, मुलगी व मुलगा सुमित बाजिराव पवार यांच्या समवेत वास्तव्यास होते. बाजिराव पवार यांची पत्नी व मुलगी हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. तर, मुलगा सुमित तसेच मयत बाजिराव पवार हे दोघेच घरी होते. मुलगा सुमित याला दारुचे व्यसन असल्याने त्याने बापाकडे दारुपिण्यासाठी तगादा लावला. परंतु पैशांवरून दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला जाऊन सुमित याने मागचापुढचा विचार न करता तीक्ष्ण हत्याराने वडिलांवर माने जवळ वार केला.

जुन्या वादातून कॅबचालकाची हत्या
दोन आरोपींनी मध्यरात्रीच्या सुमारास चाकूने भोसकले
जुन्या वादातून एका तरुण कॅबचालकाची दोन आरोपींनी मध्यरात्रीच्या सुमारास चाकूने भोसकून हत्या केली. यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. यश विष्णू गोनेकर (२१, म्हाडा क्वॉर्टर, कपिलनगर) असे मृतकाचे नाव आहे. तर शेख अरबाज शेख ईकबाल (म्हाडा कॉलनी) व असलम उर्फ गुड्डू मकसूद अन्सारी (म्हाडा कॉलनी) हे आरोपी आहेत. काही दिवसांअगोदर यश व अरबाजचे भांडण झाले होते. त्यानंतर अरबाजने घरी जाऊन यशची माफी मागितली होती. गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास यश ओलाची ट्रीप आली म्हणून घराबाहेर निघाला. रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास फरदीन सेलिब्रेशन हॉलजवळ आरोपींनी त्याला अडवले व त्याच्या मांडीवर तसेच पार्श्वभागात चाकू भोसकला. यात यश गंभीर जखमी झाला. त्याला अगोदर मेयो इस्पितळात नेण्यात आले.