आमदार-मतदाराने एकमेकांच्या श्रीमुखात भडकावली

0

काँग्रेस उमेदवाराच्या भावाने एकाला लाथ मारली
आंध्र प्रदेशातील गुंटूर येथून एक व्हिडिओ समोर आला आहे. येथे वायएसआर काँग्रेसचे आमदार अण्णाबथुनी शिवकुमार यांनी एका मतदाराला थप्पड मारली. त्याला प्रत्युत्तर म्हणून मतदारानेही थप्पड मारली. यानंतर आमदार समर्थकांनी त्या व्यक्तीला मारहाण केली. रांगेत न आल्याने त्या व्यक्तीने आमदाराला अडवले होते, त्यामुळे वाद झाला.

 

राज्यात ११ मतदारसंघात मतदान 

राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यात आज दि.१३ मे २०२४ रोजी सकाळी ७ वा.पासून मतदान सुरु झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.४५ टक्के मतदान झाले आहे.लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी (१३ मे) मतदान पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील ११ जागांसह १० राज्यांमधील ९६ मतदारसंघात मतदान होणार आहे. या टप्प्यात देशभरात एकूण १७१७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी समाधान कारक होती. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजतापासून सूरु झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १७.५१ टक्के मतदान झाले आहे.
नंदुरबार – २२.१२ टक्के
जळगाव- १६.८९ टक्के
रावेर – १९.०३ टक्के
जालना – २१.३५ टक्के
औरंगाबाद – १९.५३ टक्के
मावळ -१४.८७ टक्के
पुणे – १६.१६ टक्के
शिरूर- १४.५१ टक्के
अहमदनगर- १४.७४ टक्के
शिर्डी -१८.९१ टक्के
बीड – १६.६२ टक्के

 

ठिकठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड
लोकसभा निवडणूक चौथा टप्पा
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील अंजनडोह मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला आहे. तब्बल एक तासापासून ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झालाय. ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्यामुळे एक तासापासून मतदान प्रक्रिया ठप्प झाली आहे. मतदान केंद्रावरील कर्मचारी आणि मतदार मतदान केंद्रातच बसून आहेत. एक तास बसून मतदान यंत्रात बिघाड झालाय. खुलताबाद शहरातील 56 नंबरच्या मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन चार वेळा बंद पडलं. ईव्हीएम मशीन वारंवार बंद पडल्यामुळे मतदारांच्या रांगा लागल्यात. ईव्हीएम सतत बंद पडत असल्यामुळे मतदारही वैतागले आहेत. नंदुरबार तालुक्यातील दुधाळे गावांमध्ये असलेले एक मतदान केंद्रावर यंत्रात बिघाड झाला. मतदारांना त्यामुळे बराच तात्काळत थांबावे लागले. त्यानंतर प्रशासनाने या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत केली. मतदान प्रक्रिया शांतता पार पडत असताना अचानक यांचा हत्ती काळात झाल्यामुळे मतदान प्रक्रिया खोळंबली.

मतदारांनी विक्रमी संख्येनं मतदान करावे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन

लोकसभा निवडणुकीच्या आजच्या चौथ्या टप्प्यात, 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांसाठी मतदान होत आहे. या मतदारसंघातील लोक मोठ्या संख्येने मतदान करतील आणि युवा मतदार तसेच महिला मतदार यात प्रामुख्याने अग्रेसर असतील अशी मला खात्री आहे. अधिकाधिक मतदारांनी विक्रमी संख्येने मतदान करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मोदींनी एक्स अकाऊंटवरुन मराठीसह हिंदी, इंग्रजी, बंगाली आणि तमिळ भाषिक मतदारांना मतदानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

मुंबईला महाराष्ट्रापासून कुणीही तोडू शकत नाही
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबईवर २५ वर्षे राज्य करणाऱ्यांनी मुंबईकरांना, मराठी माणसाला काय दिले? निवडणुका आल्या की, मुंबईला महाराष्ट्रातून तोडण्याचे षडयंत्र सुरू झाले आहे असे यांचे पोपट बोलू लागतात. मुंबईला महाराष्ट्रापासून कुणाचा बाप ही तोडू शकत नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मराठी माणूस बेघर झाला त्याचं आधी उद्धव ठाकरे यांनी उत्तर द्यावं, असा सवाल करत मराठी माणसाच्या नावावर मतं मागून त्यालाच नागवण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केल्याची घणाघाती टीकाहा त्यांनी केली. महायुतीचे ईशान्य मुंबईचे उमेदवार आ. मिहिर कोटेचा यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत ते रविवारी विक्रोळी येथे बोलत होते.

CBSE दहावी, बारावीचा निकाल लागला
21 लाख विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. 12वीमध्ये 87.98% विद्यार्थी उत्तीर्ण झालेल्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन विद्यार्थी त्यांचे निकाल पाहू शकतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तीर्णतेची टक्केवारी 0.65% वाढली आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा 6.40% जास्त आहे. यावेळी 91 टक्क्यांहून अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. 15 फेब्रुवारी ते 13 मार्च दरम्यान दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा झाल्या. 21,499 शाळांमधील सुमारे 21 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्याच वेळी, 12वी बोर्ड परीक्षा 15 फेब्रुवारी ते 2 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आली होती. बोर्ड परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी, अंतिम परीक्षा आणि अंतर्गत मूल्यांकनासह सर्व विषयांमध्ये एकूण 33% गुण मिळवणे आवश्यक आहे.

 

पारशिवनी तालुक्यातील नयाकुंड शिवारात दहशत
वाघाला बंदिस्त करण्यास वन विभागाला यश

पारशिवनी तालुक्यातील नयाकुंड शिवारात दहशत असलेल्या वाघाला बंदिस्त करण्यास वन विभागाला यश आले. गेल्या महिनाभरापासून एकाच परिसरात फिरणारा वाघ शेतपरिसर सोडून गावाकडे वळत होता. त्याने पालोरा गावात घुसून एक कालवड मारली. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वन विभागाने हरतऱ्हेच प्रयत्न करूनही वाघ हुलकावणी देत होता. चिचभूवन, नयाकुंड, माहुली, काळापाठा, मेहंदी, उमरी, पाली या भागात वाघाने दहशत पसरली होती.

ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे निधन
स्टेजवर परफॉर्म करतानाच घेतला अखेरचा श्वास

मराठी चित्रपटश्रुष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे दुःखद निधन झाले आहे. स्टेजवर परफॉर्म करतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सतीश जोशी यांचे मित्र राजेश देशपांडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या जाण्याने चित्रपटश्रुष्टीवर शोककळा पसरली आहे. राजेश देशपांडे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून ही दुःखद बातमी प्रेक्षकांना दिली. सतीश जोशी यांचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं, “आमचे ज्येष्ठ मित्र अभिनेते सतीश जोशी यांचे आज रंगोत्सवात स्टेजवरच दुःखद निधन झाले.

पश्चिम विदर्भात टँकर फेऱ्यांमध्ये वाढ

बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक ५७ गावांमध्ये टँकर

सद्यस्थितीत अमरावती विभागात ७१ गावांमध्ये ७५ टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक ५७ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दरवर्षी कोट्यवधींचा खर्च होऊनही कायमस्वरूपी उपाययोजना का होऊ शकल्या नाहीत, हा प्रश्न चर्चेत आला आहे. पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमध्ये दरवर्षी ऑक्टोबर ते जून या कालावधीत पाणीटंचाई निवारण कार्यक्रम राबवला जातो. अमरावती विभागात गेल्या पाच वर्षांमध्ये या कार्यक्रमावर सुमारे २०० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. तरी पाणीटंचाईची तीव्रता कायम आहे. अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यात ५७ गावांमध्ये ५८ टँकर, अमरावती जिल्ह्यात ८ गावांमध्ये ११ टँकर तर यवतमाळ जिल्ह्यात ६ गावांमध्ये ६ टँकर लागले आहेत. अकोला आणि वाशीम जिल्ह्यात अद्याप टँकर सुरू करण्यात आले नसले, तरी येत्या काही दिवसांत टँकरची व्यवस्था करावी लागणार आहे.