जपानला भूकंपाचा तीव्र धक्का

0

टोकिओ  Tokyo : नववर्षाचे धुमधडाक्यात स्वागत सुरु असतानाच सोमवारी उत्तर मध्य जपानला तीव्र भूकंपाचा धक्का बसला. ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तीशाली भूकंपानंतर इशिकावा, निगाता आणि तोयामा किनारपट्टीवर त्सुनामीचा इशारा देण्यात आला. (Earthquake in Japan) या भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. या भूकंपामुळे न्यूक्लिअर पॉवर प्लाँटला काही धोका निर्माण झाला आहे का याबाबत तपासणी सुरू आहे.

हे प्लांट होकुरिकू इलेक्ट्रिक पॉवर कंपनीचे आहेत, असे सांगण्यात आले. दरम्यान या भूकंपामुळे दक्षिण कोरियानेही आपल्या किनारी भागातील शहरांना इशारा दिला आहे. समुद्राच्या पातळीत वाढ होण्याचा धोका असल्याचं या इशाऱ्यात म्हटलं आहे.
७ ते ८ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप तीव्र मानला जातो व त्यामुळे इमारती कोसळण्याचा आणि रस्ते दुभंगण्याचा धोका असतो. मात्र, भूकंपाचा केंद्रबिंदू शहरात नसल्याने जपानला सध्या मोठा धोका नाही. मात्र, समुद्रात भूकंप झाल्यामुळे मोठमोठ्या त्सुनामीच्या लाटा येण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळेच किनारी भागातील शहरांना इशारा देण्यात आला आहे, असे सूत्रांनी सांगितले.