
जालना JALNA -समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच आहे. कारचे नियंत्रण सुटून भरधाव कार महामार्गावर बाजुला उभ्या कंटेनरवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात नागपुरातील तीन रहिवासी मृत्यूमुखी (Accident on Samruddhi Highway) पडले. शुक्रवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास निधोना येथे हा अपघात घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. रामोजी शिवराज तिजारे (५०), मालुबाई पुरी (७०), शांताबाई पुरी (४५) अशी मृतांची नावे असून हे लोक नागपुरात जगनाडे चौक परिसरात राहात असल्याची माहिती आहे.
मालुबाई पुरी आणि शांताबाई पुरीया मायलेकी गुरुवारी सायंकाळी अहमदनगर येथे धार्मिक विधीसाठी रामोजी शिवराज तिजारे यांची कार घेऊन गेल्या होत्या. विधी आटोपल्यानंतर मालुबाई, शांताबाई, रामोजी व त्यांचा मुलगा सूरज तिजारे (२२) हे कारने नागपूरकडे जात होते. या वेळी निधोना शिवारात चालक रामोजी तिजारे यांचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार महामार्गावर बाजूला उभ्या कंटेनरवर धडकली. यात तिघेही जागीच ठार झाले, तर सूरज गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्यास रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघातास कंटेनर चालकही जबाबदार असल्याचे लक्षात आल्यावर त्यालाही अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील आठ दिवसात सिंदखेडराजा व करमाड दरम्यान तीन अपघातात ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.