

अस्वच्छतेचा मलिदा कोण लाटत आहेत ?
अमरावती (Amravati) :- अमरावती शहरात महानगरपालिकेकडून साफसफाई होत नसल्याने साथीचे आजार पसरत आहेत म्हणून आ. रवी राणा यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मनपा प्रशासनाला धारेवर धरून कडक निर्देश दिल्याबद्दल आ रवी राणा यांचे आभार.
नेहमी प्रमाणे या बैठकीतील गरम माहोलच्या बातम्या सर्वत्र उमटल्या आहेत. आ. रवी राणा यांनी याच बैठकीत शहरात साफसफाईचा कंत्राट घेणारे कंत्राटदार आणि विविध परिसरातील नागरिकांचे प्रतिनिधी बोलवले असते तर या कंत्राटदारांनी शहराच्या स्वच्छतेची कशी वाट लावली आहे, याचे पुरावे अधिकाऱ्यांना जागेवरच मिळाले असते. आता मनपानेच एक बैठक बोलवून कंत्रातदारांसमक्ष नागरिकांचे म्हणणे ऐकावे. जेव्हापासून साफसफाईचा नवा कंत्राट देण्यात आला तेव्हा पासून अमरावती शहर अधिकाधिक गलिच्छ करण्याचा जागतिक विक्रम सुरू झाला आहे.
या कंत्राटदारांसमोर ‘ब्र’ काढण्याची सामान्य माणसाची हिंमत नाही. कारण या सर्व ठेकेदारांना मोठा राजाश्रय आहे. मोठ्या नेत्यांचे बगलबच्चे शहराला अधिकाधिक घाण करून मलिदा लाटताहेत. हे ठेकेदार कोण आहेत, यांनी प्रत्येक प्रभागात सफाईसाठी किती माणसं नेमले आहेत, प्रत्येक प्रभागाला किती घंटीकटले किंवा घंटा गाड्या आहेत, प्रत्येक प्रभागात किती कचरा कंटेनर आहेत, फवारणी, गवत झुडपे कापणे, कचरा कंटेनर वेळेवर उचलणे ही कामे कोणाची, हा सर्व गोषवारा मनपाने जनतेसाठी जाहीर करायला हवा. ठेकेदार मोठ्या नेत्यांच्या गळ्यातला ताईत असल्याने तो सामान्य लोकांशी अरेरावी करतो. त्याला वठणीवर आणणाऱ्या अधिकाऱयांना राजकीय दबावात तोंडात मूग गिळून कारवाई न करता शहराची दुर्दशा सहन करावी लागते का, असे असंख्य प्रश्न जनतेच्या मनात आहेत.
ठेकेदार कोणत्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत, ते कोणाचे प्रायोजक आहेत, यावर जनता खुलेपणाने चर्चा करते. ये पब्लिक है – सब जानती है ! तरीपण या बैठकीचा परिणाम साधायचा असेल तर घंटीकटल्यावरच्या घंट्या या ठेकेदारांच्या गळ्यात बांधण्याची हिंमत जो पर्यंत दाखवली जाणार नाही, तो पर्यंत शहर स्वच्छ होणार नाही. शहराची वाट लावणाऱ्या या ठेकेदारांवर कारवाई झाल्याशिवाय शहर स्वच्छ होणार नाही, असा जनतेचा सूर आहे. आ. रवी राणा आणि सर्व लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देतील अशी जनतेची अपेक्षा आहे.
शिवराय कुळकर्णी
प्रवक्ता, भाजपा, महाराष्ट्र