


शिक्षणातूनच समाजाचा आणि राष्ट्राचा विकास : खासदार अमर काळे
खा.अमर काळे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; श्री माळी वैभव वर्ध्याचा उपक्रम
वर्धा : शिक्षणातूनच समाजाचा आणि राष्ट्राचा सर्वांगीण विकास होतो. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा केवळ त्यांच्या यशाचा गौरव नसून त्यांच्या पालकांचा, शिक्षकांचा आणि समाजाचा अभिमान आहे. विद्यार्थी हेच आपल्या देशाचे खरे भांडवल आहेत, असे प्रतिपादन खासदार अमर काळे यांनी केले.
बजाज सार्वजनिक वाचनालय येथे श्री माळी वैभव वर्धा जिल्ह्याच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमात खासदार अमर काळे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
खासदार काळे पुढे म्हणाले, “आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ गुण मिळवणे पुरेसे नाही, तर चांगले संस्कार, आत्मविश्वास आणि समाजाप्रती जबाबदारीची जाणीव असलेला विद्यार्थीच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतो. त्यामुळे अभ्यासाबरोबर सामाजिक बांधिलकी जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”
ते पुढे म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी केवळ डॉक्टर, इंजिनिअर होण्यापलीकडे जाऊन स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आयएएस, आयपीएस, एमपीएससी सारख्या प्रशासकीय सेवांमध्ये जाण्याचे ध्येय ठेवावे. विदर्भात अशा स्पर्धा परीक्षांकडे झुकाव कमी दिसतो, हे चिंतेचे आहे. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना या दिशेने मार्गदर्शन मिळाले पाहिजे.”
यावेळी खासदार काळे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. त्यांनी सांगितले की, “आज ज्यांचा सत्कार होत आहे, त्यात काही विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर होण्याची तयारी करत आहेत, तर काहींनी वेगळा मार्ग निवडला आहे. सार्थक वनकर या विद्यार्थ्याने इंडियन आर्मीमध्ये जाण्याचे ध्येय ठेवले आहे, हे ऐकून मला अत्यंत आनंद झाला. अशा ध्येयवेड्या तरुणांचे अभिनंदन करायलाच हवे.”
खासदार काळे यांनी पुढे सांगितले की, “श्री माळी वैभव वर्धा जिल्ह्याच्या माध्यमातून गेल्या अकरा वर्षांपासून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते आणि समाजात शिक्षणाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण होते. भविष्यातही असे उपक्रम राबवावेत,” असे त्यांनी मत व्यक्त केले.
यावेळी मोठ्या संखेने विद्यार्थी, पालक,तसेच श्री माळी वैभव वर्धा जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.