
नागपूर, ४ नोव्हेंबर: नागपूरच्या देखण्या फुटाळा तलावाच्या आकाशात मंगळवारी रोमांचक दृश्य पाहायला मिळाले. प्रशिक्षित पायलटांनी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांवर — फुटाळा तलाव, व्हेटरिनरी कॉलेज,सेमिनरी हिल,तेलनखेड़ी आणि भरत नगर परिसरावर — थरारक *पॅरामोटरींग उड्डाणांचे* सादरीकरण केले.
या दृश्याने फुटाळा परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली. लोकांनी रंगीबेरंगी पॅरामोटर आकाशात उडताना पाहत उत्साहाने स्वागत केले. अनेक जणांनी प्रत्यक्ष पॅरामोटरींग उड्डाणाचा अनुभव घेण्यासाठी उत्सुकता व्यक्त केली.
मध्य भारतात पॅरामोटरींग या क्रीडेची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. ही क्रीडा व रोमांच यांचा अदभुत संगम आहे. नागपूर व इतर परिसरातील नैसर्गिक सौंदर्य आणि वारसा यांचे दर्शन आकाशातून घडविण्याचे हे एक अनोखे माध्यम ठरत आहे.
हे सर्व उड्डाण श्री. प्रकाश चिव्हे, श्री. अभय राठोड आणि श्री. सुभाष धुर्वे या प्रशिक्षित व प्रमाणित पायलटांनी केले. योग्य हवामान आणि सुरक्षिततेच्या सर्व उपायांसह, आगामी काळात रामटेक येथून नियमित हवाई साहसी खेळ व पॅरामोटरींग उड्डाणे राबविण्याची योजना आखत आहेत, ज्यामुळे अधिकाधिक लोकांना पॅरामोटरींगचा अनुभव घेता येईल. तसेच नागपूर आणि परिसरातील निसर्गरम्य दृश्यांचा आनंद लोकांना हवेतून अनुभवण्याची संधी मिळेल.


















