संसदेत घुसखोरी करणाऱ्या तिघांना अटक

0

 

बनावट आधार कार्डाच्या आधारे प्रवेशाचा प्रयत्न

नवी दिल्ली (New Delhi)07 जून :- देशाच्या संसदेत आज, शुक्रवारी घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला. परंतु, सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे बनावट आधार कार्डाच्या माध्यमातून संसद भवन परिसरात शिरकावाच्या प्रयत्नात असलेले कासिम, मोनिस आणि शोएब या तिघांना अटक करण्यात आलीय. हे तिघेही डीव्ही प्रोजेक्ट्स लिमिटेड (DV PROJECTS LIMITED) या कंपनीत मजूर असल्याची माहिती चौकशीत पुढे आलीय.

यासंदर्भात पुढे आलेल्या माहितीनुसार कासिम, मोनिस आणि शोएब हे तिघे आयजी 7 मध्ये एमपीच्या लाउंजच्या बांधकामासाठी आले होते. पुढील तपासासाठी या आरोपींना संसद मार्ग पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.(The accused were handed over to Sansad Marg police station.) या तिन्ही आरोपींवर भारतीय दंड संहितेची बनाव आणि फसवणुकीची विविध कलमे लावत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तिघे त्यांचे आधारकार्ड दाखवून संसदेच्या संकुलात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी सीआयएसएफच्या(CISF) जवानांना त्यांचे आधारकार्ड संशयास्पद वाटले.

आधार कार्ड तपासले असता ते बनावट असल्याचे आढळून आले. यानंतर संसद भवनाच्या सुरक्षेसाठी तैनात अन्य सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या तिघांचीही कसून चौकशी केली. या तिघांनी आधार कार्ड कधी, कुठे आणि कसे बनवले, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, डिसेंबर 2023 मध्ये संसदेच्या लोकसभा सभागृहात घुसखोरी करण्यात आली होती. त्यावेळेस सभागृहातील बाकांपर्यंत पोहोचून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच हल्लाबोल केला होता.