कार्ड असूनही हजारो मतदार मतदानापासून वंचित, जबाबदार कोण?

0

नागपूर (Nagpur): पूर्व नागपुरातील नागरिकांनी मतदानासाठी मोठा उत्साह दाखविला, मात्र यंदा मतदार यादीत इतक्या मोठ्या प्रमाणात घोळ आहे, अनेक मतदात्यांना मतदान कार्ड असूनही बी.एल.ओ. च्या बोगस कारभारामुळे मतदानापासून वंचित राहावे लागले. जिल्हाधिकारी यांनी मतदान वाढविण्यासाठी प्रयत्न केले खरे मात्र त्यांच्या कार्यालयातील अधिकारी व बी.एल.ओ. ने त्यांच्या सर्व आदेशांना केराची टोपली दाखविली व मनमर्जीने कारभार करून शहरातील लाखो मतदार मतदानापासून वंचित राहिले, याला जबाबदार कोण? असा सवाल भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी उपस्थित केला आहे. एकीकडे देशाच्या लोकशाहीसाठी निवडणूक आयोग अनेक प्रकारच्या यंत्रणा राबवितात तर खालच्या स्तरावर बी.एल.ओ. बोगस कारभार करून या सर्व यंत्रणा फेल करतात. यावर प्रशासनाने गंभीर दखल घेतली पाहिजे, अशी मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी केली. पूर्व नागपुरातील बोगस मतदार यादीसंदर्भात काही ठळक मुद्दे त्यांनी उपस्थित केले आहेत. यात मतदार यादीमध्ये मृत झालेल्या नावाची नोंद 25 ते 30 हजार असून 10-15 वर्षापासून अन्य ठिकाणी प्रस्थापित झालेले मतदार परंतु नावे कायम 40 ते 45 हजार
अनेक परिवारांचे मतदान कार्ड असूनसुद्धा यादीत नाव गहाळ झाले असे मतदार किमान 40 ते 45 हजार
पूर्व मतदार संघातील काही मतदारांची नावे अधिक अंतरावर किंवा दुसऱ्या विधानसभा क्षेत्रात असणे – 8 ते 10 हजार असून ज्यांनी विहित मुदतीत फॉर्म नं. 6 भरले, अशा तरुण मतदारांची नावे आलीच नाही अशा मतदारांची संख्या 8 ते 10 हजार असून अनेक मतदार ज्यात वृद्ध मतदारांची संख्या अधिक व ज्यांनी मागच्या निवडणुकीत मतदान केले, ज्यांच्याकडे मागील निवडणुकीची पर्ची सुद्धा आहे, अशा हजारो मतदारांची नावे मतदार यादीतून गहाळ झाली. याउलट मागील 10 वर्षापेक्षा अधिक कालावधी पासून मृत पावलेल्या हजारो मतदारांची नावे मतदार यादीत प्रत्येक बुथवर आहे, ही अत्यंत गंभीर बाब असून प्रशासनाने दखल घेण्याची आवश्यकता आहे.
अनेक मतदान केंद्रावर शासनाकडून मतदारांसाठी कसलीही सोय नव्हती. अनेक केंद्रावर मतदार उन्हात उभे असताना दिसले. पिण्याचे पाण्याची काहीच व्यवस्था नाही. मतदान फार मंदगतीने होत असल्यामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले. मतदान केंद्रावर पेंडालची व्यवस्था नव्हती. ज्यांना कुणाला मतदान केंद्रावर सोय करण्याचे काम दिले. त्यांची चौकशी करून कारवाई करणे अपेक्षित. अनेक मतदान केंद्रावर योग्य प्रकाश व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे वृद्ध मतदारांना मतदान करण्यास अडचण जाणवली. या सर्व बाबींमुळे सरकारी यंत्रणा कशा प्रकारे फोल ठरली हे लक्षात येते.
दरवर्षी प्रशासनाच्या वतीने प्रत्येक मतदार केंद्रावर बी.एल.ओ. ची नियुक्ती करण्यात येते. मतदारांशी संपर्क करून नवीन मतदार नोंदविणे, मृत मतदार वगळणे, दुबार मतदान वगळणे व निवडणुकीच्या वेळेस मतदान पर्ची मतदारांच्या घरापर्यंत पोहोचविणे, हे बी.एल.ओ. चे काम असते. मात्र हे सर्व बी.एल.ओ. सपशेल फेल ठरले असून आपल्या घरूनच मतदार यादी दुरुस्ती करण्याचे काम करतात, हे सिद्ध झाले आहे. अनेक मतदान केंद्रावर वेळेवर मतदारांना मतदान पर्ची देण्यात येत असताना आढळले, ज्यात अनेक मतदान केंद्रांचा समावेश आहे या गंभीर बाबीकडे आ कृष्णा खोपडे यांनी लक्ष वेधले.