हजारो भाविकांनी घेतली पवित्र ‘संगम जल’ स्‍नानाची दिव्‍य अनुभूती

0

– अॅड. आशिष शेलार यांच्‍या हस्‍ते झाली महाआरती

प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभातीला महास्‍नानाची दिव्‍य अनुभूती हजारो नागपूरकर भाविकांनी शनिवारी अनुभवायला मिळाली. रेशीमबाग मैदानावर सुरू असलेल्‍या ‘महाकुंभ प्रयाग योग’ मध्‍ये महाकुंभातील हे पवित्र ‘संगम जल’ आणण्‍यात आले असून अतिशय मंगलमय वातावरणा त्‍याचा वर्षाव भाविकांवर केला जात आहे.
महाराष्ट्राचे सांस्‍कृतिक मंत्री अॅड. आशीष शेलार (ASHISH SHELAR) व त्‍यांच्‍या प्रत्‍नी प्रतिमा शेलार यांनी आज महाकुंभ प्रयाग योगला भेट दिली. त्‍यांच्‍या हस्‍ते यावेळी महाआरती करण्‍यात आली. यावेळी व्‍हॅल्‍यूएबल ग्रुपचे संचालक अमेय हेटे यांनी अॅड. आशीष शेलार यांना पवित्र कलश प्रदान केला. याप्रसंगी नरेंद्र हेटे, मंजिरी हेटे, अंकित हेटे, सत्संग फाउंडेशनचे शुक्रे यांची प्रमुख उपस्‍थ‍िती होती.

– रेशीमबागचा परिसर झाला भक्‍तीमय

अॅड. आशीष शेलार यांनी सांस्‍कृतिक विभागातर्फे आयोजक संस्‍थांचे, नागपूरकरांना महाकुंभ स्‍नानाची अनुभूती मिळवून दिल्‍याबद्दल आभार मानले. प्रयागराजच्‍या महाकुंभ करोडो भाविक स्नान करीत असून ज्‍या नागपूरकरांना काही कारणात्‍सव त्‍याचा लाभ घेता येत नाही त्‍यांच्‍यासाठी ही सुवर्णसंधी आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले. दिवसभर येथे शिवशक्‍ती याग व सांस्‍कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले.
…….
पादुकांच्‍या दर्शनासाठी लोटली गर्दी
महाकुंभ प्रयाग योग येथे श्री गजानन महाराजांच्‍या मुंडगाव येथील प्रासादिक पादुका, अक्‍कलकोट येथील श्री स्‍वामी समर्थ यांच्‍या धर्मपादुका, शिर्डी येथील श्री साईबाबांच्‍या प्रासादिक पादुका व सटका, सज्‍जनगढ येथील श्री समर्थ रामदासस्‍वामी यांच्‍या प्रासादिक पादुका, श्री श्रीधरस्‍वामी महाराज, श्री महेश्‍वरनाथ बाबाजी महाराज, श्री पंत महाराज यांच्‍या पादुका दर्शनासाठी ठेवण्‍यात आल्‍या आहेत. त्‍यांचे दर्शन घेण्‍यासाठी येथे दिवसभर भाविकांनी गर्दी केली.
……….
रथयात्रेला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद
आज शनिवारी सकाळी श्री गजानन चौक पासून रेशीमबाग मैदानापर्यंत रथयात्रा काढण्‍यात आली. फुलांनी सजवलेल्‍या रथामध्‍ये ठेवलेल्‍या जलकुंभ व श्रींच्‍या पादुका ठेवण्‍यात आल्‍या होत्‍या. त्‍याचे दर्शन घेण्‍यासाठी महिला, पुरूष व बालकांची चांगलीच गर्दी केली.
……
आज ‘महाकुंभ प्रयाग योग’ मध्‍ये
रविवार, 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता मुख्‍यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते महाआरती. सायंकाळी 5 वाजता पद्मभूषण मा. श्री एम यांचा व्‍हर्च्‍युअल सत्‍संग
सायंकाळी 6.30 वाजता महाआरतीने महाकुंभ प्रयाग योगचा समारोप