हातातोंडाशी आलेली पिके जगवण्यासाठी उजनीकाठच्या शेतकऱ्यांची धडपड

0

सोलापूर, 19 मे: सोलापूर जिल्ह्यासाठी मोठे वरदान मानल्या जाणा-या महाकाय उजनी धरणातील पाणीसाठा प्रचंड प्रमाणावर खालावत रसातळाला गेला आहे. त्यातच दुष्काळाचे संकट ओढवल्याच्या पार्श्वभूमीवर उजनीच्या काठावर जीवापाड जपलेली ऊस, केळी आदी नगदी पिके पाण्यावाचून सुकून चालली आहेत. ही पिके वाचविण्यासाठी शेतक-यांची मोठी केविलवाणी धडपड सुरू आहे. उजनी लाभक्षेत्र म्हणून ओळखला जाणारा करमाळा तालुक्यातील कंदर ते कोंढार चिंचोली हा पट्टा केळी व ऊस बागायतीसाठी प्रसिद्ध आहे. कंदर, केडगाव, पांगरे, वांगी, दहिगाव, चिकलठाण, कुगाव, सोगाव, उमरड, मांजरगाव, उंदरगाव, वाशिंबे, पारेवाडी, केतूर, पोमलवाडी, खतगाव, टाकळी, कोंढार चिंचोली आदी गावांची त्यासाठी विशेष ओळख बनली आहे.

परंतु यंदा उजनी धरणात केवळ ६०.६६ टक्के पाणीसाठा होऊ शकला होता. त्यात पुन्हा पाणीवाटपाचे नियोजन चुकल्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने खालावला आहे. हिवाळ्यातच धरणातील पाणीसाठा वजा पातळीवर गेला असताना सध्याच्या तीव्र उन्हाळ्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी पातळी नेहमीपेक्षा पाच ते सहा किलोमीटर लांब जात आहे. कृषी पंपांच्या मोटारींसाठी इतक्या दूरपर्यंत वीज पुरवठा करणे शक्य नसल्याने आणि पाणी पातळी दूर गेल्यामुळे या भागातील शेतकरी वर्गणी करून पोकलेनच्या साह्याने साधारणतः २० फूट रुंदीच्या आणि १५ फूट खोलीच्या चाऱ्या पाडून विद्युत मोटारींपर्यंत पाणी आणण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत.