उदघाटनानंतर हा भुयारीमार्ग नागरिकांसाठी लगेचच खुला

0

सोमलवाडा (मनीष नगर) आरयूबी लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला

नागपूर: सोमलवाडा (मनीष नगर) येथील बहुप्रतीक्षित रेल्वे अंडर ब्रिज (आरयूबी) च्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन आज संध्याकाळी ६.३० वाजता करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुमारे ३३.८३ कोटी रुपयांच्या खर्चाने उभारण्यात आलेल्या या आरयूबीची लांबी १९० मीटर, रुंदी ८ मीटर आणि उंची ४ मीटर असून, हा प्रकल्प मुंबई-हावडा आणि दिल्ली-चेन्नई या व्यस्त रेल्वे मार्गांवर उभारण्यात आला आहे. विशेषतः पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र पादचारी मार्ग देखील तयार करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना संबोधित करताना सांगितले की, “हा प्रकल्प मनीष नगर परिसरातील नागरिकांसाठी मोठ्या स्वरूपाचा दिलासा ठरणार आहे. वाहतूक कोंडी आणि रेल्वे फाटकांमुळे होणारा त्रास यामुळे पूर्णतः संपुष्टात येईल.”

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रकल्पाचे कौतुक करताना भविष्यातील नागपूरच्या विकासासाठी अशा पायाभूत सुविधा अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे सांगितले.

यामुळे मनीष नगर, बेसा, घोगली, बेलतरोडी या भागांतील लाखो नागरिकांना मोठा लाभ होणार आहे. कार्यक्रमाला महा-मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. अभिजित चौधरी तसेच महा-मेट्रोचे संचालक श्री. अनिल कोकाटे आणि श्री. राजीव त्यागी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.उदघाटनानंतर लगेचच मार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात आला, ज्यामुळे परिसरातील रहिवाशांना सुलभ प्रवासाचाअनुभव मिळाला.