

लोकसभा निवडणुकीत भाजपचे खाते उघडले
सुरतचे उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध विजयी
गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल सोमवारी बिनविरोध निवडून आले. लोकसभा निवडणुकीत भाजपचे खाते उघडले आहे. वास्तविक येथून काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज रद्द करण्यात आला. त्यांच्या अर्जात साक्षीदारांची नावे आणि स्वाक्षऱ्यांमध्ये चूक होती. (Bjp)
loksabha 2024 या जागेवर भाजप आणि काँग्रेससह 10 उमेदवार रिंगणात होते. रविवारी 7 अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते. फक्त बसपचे उमेदवार प्यारे लाल भारती राहिले होते, त्यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. अशा प्रकारे मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवड झाल्याबद्दल मुकेश दलाल म्हणाले, ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांचा आभारी आहे. मी लोकशाही पद्धतीने जिंकलो आहे. मी माझ्या मतदार आणि कार्यकर्त्यांचाही मनापासून आभारी आहे.
मुकेश दलाल यांनी पहिल्यांदाच सुरतमधून निवडणूक लढवली होती. या जागेवर भाजपच्या दर्शना जरदोश गेल्या तीन टर्मपासून विजयी होत होत्या. मात्र यावेळी त्यांचे तिकीट रद्द करून मुकेश दलाल यांना स्थान देण्यात आले आहे. दलाल हे भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांचे निकटवर्तीय आहेत. मुकेश दलाल हे गेल्या 43 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. ते सलग तीन वेळा या भागातून नगरसेवक राहिले आहेत. याशिवाय भाजप युवा मोर्चातही त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
गृहमंत्री अमित शहा दीड महिन्यांत दुसऱ्यांदा अकोल्यात
अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर चढला आहे. जाहीर सभांमधून प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ गृहमंत्री अमित शहा दीड महिन्यांत दुसऱ्यांदा अकोल्यात दाखल होणार आहेत. काँग्रेस व वंचितचादेखील सभांमधून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. धोत्रे यांच्या प्रचारासाठी २३ एप्रिलला देशाचे गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शहा अकोल्यात दाखल होणार आहेत. शहरातील अकोला क्रिकेट मैदानावर मंगळवारी दुपारी त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अमित शहा यांनी अकोल्यात पश्चिम विदर्भातील मतदारसंघांचा आढावा घेतला होता. त्यानंतर आता अवघ्या दीड महिन्यातच ते प्रचारासाठी पुन्हा एकदा अकोल्यात येणार आहेत.
शेतीसाठी संपूर्ण ‘सोलर’ वीज देणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास
येत्या ६ ते ८ महिन्यांत राज्यातील शेतकऱ्यांना वर्षातील ३६५ दिवस संपूर्ण वीज पुरवठा सौर उर्जेद्वारे देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राज्यात शेतकऱ्यांची शेतीकरिता विजेची गरज १६ हजार मेगावॅट एवढी आहे. यापैकी गत दीड वर्षात ९ हजार मेगावॅट वीज सौर उर्जेच्या माध्यमातून पुरवठा करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित ७ हजार मेगावॅट वीजपुरवठा सोलरच्या माध्यमातून देण्याची प्रक्रिया येत्या ६ ते ८ महिन्यांत पूर्ण होईल आणि त्यानंतर शेतीसाठी सोलरद्वारे वीजपुरवठा उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे आणि हा वीजपुरवठा दिवस रात्र वर्षाचे ३६५ दिवसही होणार आहे, असेही ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत भाजपचे खाते उघडले
सुरतचे उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध विजयी
गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल सोमवारी बिनविरोध निवडून आले. लोकसभा निवडणुकीत भाजपचे खाते उघडले आहे. वास्तविक येथून काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज रद्द करण्यात आला. त्यांच्या अर्जात साक्षीदारांची नावे आणि स्वाक्षऱ्यांमध्ये चूक होती.
या जागेवर भाजप आणि काँग्रेससह 10 उमेदवार रिंगणात होते. रविवारी 7 अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते. फक्त बसपचे उमेदवार प्यारे लाल भारती राहिले होते, त्यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. अशा प्रकारे मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवड झाल्याबद्दल मुकेश दलाल म्हणाले, ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांचा आभारी आहे. मी लोकशाही पद्धतीने जिंकलो आहे. मी माझ्या मतदार आणि कार्यकर्त्यांचाही मनापासून आभारी आहे.
फडणवीस यांच्या भेटीनंतर विनोद पाटलांचा निर्धार
भुमरेंच्या उमेदवारीवर फेरविचार होईल असा विश्वास
छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या वतीने पैठण विधानसभा मतदारसंघातील आमदार तथा मंत्री संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, असे असतानाही इच्छुक विनोद पाटील यांनी आपला उमेदवारीचा दावा कायम ठेवला आहे. या संदर्भात त्यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर विनोद पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा पुनर्विचार होऊ शकतो, अशी आशा व्यक्त केली आहे. इतकेच नाही तर मला महायुतीकडून उमेदवारी हवी आहे. मात्र, ती मिळाली नाही तरी देखील मी निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
शेतकऱ्यांना मिळणार कापूस व सोयाबीनमधील फरकाची रक्क
राळेगाव सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांची ग्वाही
कापूस आणि सोयाबीनचे दर घसल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने आचारसंहितेपूर्वीच कापूस आणि सोयाबीनमधील फरकाची रक्कम देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी चार हजार कोटी रूपयांची तरतूदही केली. मात्र अचारसंहितेमुळे ही रक्कम वाटप करता आली नाही. आता आचारसंहिता संपल्याबरोबर ही फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राळेगाव येथील निवडणूक सभेत दिली.
काँग्रेसने उदयनराजेंना नेहमी बाजूला ठेवले
दमयंतीराजे भोसले यांचा गंभीर आरोप
काँग्रेसने उदयनराजे भोसले यांना कायम बाजूला ठेवून त्यांची हेटाळणी केल्याचा आरोप उदयनराजे यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले यांनी सोमवारी काँग्रेसवर निशाणा साधताना केला. त्यांच्या या आरोपामुळे सातारा लोकसभा मतदार संघातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. सातारा लोकसभा मतदार संघातील निवडणूक प्रचार सध्या चांगलाच रंगात आला आहे.
70 वर्षांनंतर साहित्य संमेलन दिल्लीत होण्याची शक्यता
इचलकरंजी, मुंबई आणि दिल्ली या तीन ठिकाणी भेट देणार
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक रविवारी मुंबईत पार पडली. आगामी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ७० वर्षांनंतर पुन्हा एकदा राजधानी दिल्लीत होण्याची शक्यता आहे. संमेलनासाठी दिल्लीतून एकाचवेळी दोन संंस्थांची निमंत्रणे आली आहे. दिल्लीसोबतच इचलकरंजी, औंध, औदुंबर, मुंबई आणि धुळे येथूनही निमंत्रणे आली आहेत. परंतु, रविवारी मुंबईत झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत इचलकरंजी, मुंबई आणि दिल्ली या तीन ठिकाणी भेट देण्याचे ठरवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यातही दिल्लीबाबत यावेळी सकारात्मक विचार केला जाण्याची शक्यता आहे. १९५४ साली दिल्लीत झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मणशास्त्री जोशी होते.
राज ठाकरे यांना मोठा दिलासा
कोणताही पुरावा नसल्याचा न्यायालयाचा निर्णय
2008 मधील उस्मानाबादची घटनाच्या भडकाऊ भाषण प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कथित प्रक्षोभक भाषण आणि चिथावणी देण्याबाबत कोणतेही पुरावे नसल्याचे म्हटले आहे. तसेच न्यायालयाने राज ठाकरे यांच्यावरील खटला फेटाळून लावला आहे. 16 वर्षे जुन्या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता करण्याची याचिका फेटाळली होती. या आदेशाला राज ठाकरे यांनी आव्हान दिले होते.
शिक्षकाचे विद्यार्थिनीशी अश्लील चाळे
नागपुरातील संतापजनक घटना
वर्गात एकटीच अभ्यास करीत असलेल्या विद्यार्थिनीशी वासनांध शिक्षकाने अश्लील चाळे करीत शारीरिक संबंधांची मागणी केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षका विरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अमोल हा कोराडीतील एका खासगी शाळेत शिक्षक असून शिकवणीअमोल पाटील (40 रा. येरखेडा, कामठी) असे आरोपीचे नाव आहे. अमोल विरुद्ध यापूर्वीही विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
राज्यात काही ठिकाणी विजांसह पाऊस
हवामान खात्याचा अंदाज
येत्या २४ तासात चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, धाराशिव, लातूर, नांदेड, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गडगडाट आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विजेच्या खांबापासून आणि इतर धोकादायक ठिकाणांपासून दूर रहा, पूरग्रस्त भागात जाणे टाळा, असे आवाहन करण्यातआले आहे.