आत्मदहनाच्या इच्छेने विधानभवनावर धडकणार

0

 

 

नागपूर NAGPUR  दि. 12 डिसेंबर 2023: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 27 वर्षे सेवा बजावलेल्या श्री. नरेंद्र रामचंद्र पालांदुरकर यांचा 5 ऑगस्ट 2022 रोजी मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या पत्नी आणि मुलाला पेन्शन आणि इतर कोणताही लाभ मिळालेला नाही. यामुळे संतप्त झालेला मुलगा Nilesh Palandurkar निलेश पालांदुरकर 14 डिसेंबर रोजी विधानभवनावर धडकणार असल्याची माहिती आहे.

निलेश पालांदुरकर यांनी सांगितले की, त्यांच्या वडिलांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 27 वर्षे सेवा बजावली. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरही त्यांना कोणताही लाभ मिळाला नाही. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीला पेन्शन आणि इतर लाभ मिळावेत यासाठी त्यांनी अनेकदा प्रयत्न केले. मात्र, त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

पालांदुरकर यांनी 9 ऑक्टोबर 2023 रोजी संबंधीत विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा (व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण),मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अप्पर सचिव, संचालक यांना निवेदन दिले होते. त्यात त्यांनी 9 नोव्हेंबर 2023 पर्यंत त्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. न्याय न मिळाल्यास त्यांनी 9 नोव्हेंबर 2023 रोजी आत्मदहनासाठी परवानगी मागितली होती.

शासनाकडून आणि संबंधित विभागाकडून त्यांना कोणताही पत्रव्यवहार किंवा लाभ मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी 9 नोव्हेंबर 2023 रोजी आत्मदहनासाठी सहसंचालक कार्यालयात गेले होते. पोलिसांच्या मध्यस्थीने सहसंचालकांनी 10 डिसेंबर 2023 पर्यंत सर्व लाभ देण्याचे लिखित आश्वासन दिले होते.

11 डिसेंबर 2023 होऊनही त्यांना आणि त्यांच्या आईला कोणत्याही प्रकारचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे पालांदुरकर 14 डिसेंबर रोजी विधानभवनावर धडकणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पालांदुरकर यांच्या या निर्णयामुळे शासनावर मोठा दबाव आला आहे. शासनाने तात्काळ त्यांच्या मागण्या पूर्ण करून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.