

दोन दिवसीय ‘आरोग्य फिल्म फेस्टिवल’चे थाटात उद्घाटन
नागपूर (nagpur), 29 मार्च
पांढरे डाग, सर्पदंश, अल्झायमर, ऑटिझम या सारख्या विषयावर कलात्मक पद्धतीने तयार केलेल्या फिल्म्स समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी व गैरसमज दूर करण्यासाठी महत्वाच्या असून त्यांच्यामुळे आरोग्यदायी समाजनिर्मिती होण्यास मदत होते, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी केले.
ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशनच्यावतीने व पी. एम. शाह फाउंडेशन पुणे, नागपूर महानगरपालिका, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, सिनेमोंताज आणि सप्तक यांच्या सहकार्याने दोन दिवसीय ‘ऑरेंज सिटी आरोग्य चित्रपट महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. कविकुलगुरु कालिदास सभागृहात या महोत्सवाचे रविवारी डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते दीपज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंचावर पी. एम. शाह फाउंडेशन पुणेचे संचालक अॅड. चेतन गांधी, ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. मंदाकिनी आमटे यांची उपस्थिती होती. डॉ. चंद्रशेखर मेश्राम व नम्रता मेश्राम यांच्या हस्ते आमटे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.
डॉ. प्रकाश आमटे यांनी बाबा आमटे कसे चित्रपट समीक्षक होते यांची माहिती दिली. ते म्हणाले, चित्रपट हे अतिशय शक्तीशाली माध्यम असून एकाचवेळी हजारो लोकांपर्यंत संदेश पोहोचवते. असे आरोग्याशी संबंधीत विषय फिल्म्सच्या माध्यमातून महाविद्यालयीन मुलांपर्यंत पोहोचवले गेल्यास त्यांचा अधिक लाभ होईल.
अॅड. चेतन गांधी म्हणाले, तरुण पिढीमध्ये आरोग्य समस्यांच्याबाबतीत सजग नसल्याचे लक्षात आल्यामुळे चित्रपटाचे माध्यम त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचण्याचा, लोकरंजनातून लोकप्रबोधन करण्याचा उद्देश असल्याचे सांगितले. डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी प्रास्ताविकातून या महोत्सवाबद्दल विस्तृत माहिती दिली. अॅड. चेतन गांधी यांच्यामुळे हा आरोग्यविषयक चित्रपटांचा महोत्सव नागपुरात आयोजित होत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुधीर भावे यांनी केले तर डॉ. उदय गुप्ते यांनी आभार प्रदर्शन केले.
आरोग्य चित्रपट महोत्सवाचा प्रारंभ ‘फेथ बिऑंड फिअर’ या मानसिक आरोग्यावर आधारित फिल्मच्या स्क्रीनिंगने करण्यात आला. दिवसभरात ब्रेस्ट कॅन्सर, घनकचरा व्यवस्थापन, अवयव दान, स्वच्छता अभियान, ट्रान्सजेंडर, ड्रेग अॅडीक्शन, अंधत्व अशा विविध विषयावर लघुपटांचे स्क्रीनिंग करण्यात आले.
दुपारी 1 ते 7.30 वाजेदरम्यान सर्पदेश, अंधश्रद्धा, नेत्रदान, ऑटीझम, पर्यावरण, सेक्स एज्युकेशन, अल्झायमर, लठ्ठपणा, प्रदूषण, वृद्धत्व अशा विविध विषयांवरील लघुपटांचे स्क्रीनिंग करण्यात येणार आहे.