या मतदारसंघात होणार फेरमतमोजणी; नेमकं काय घडलं?

0

नाशिक (Nashik ) या विधानसभेत होणार फेरमतमोजणी; नेमकं काय घडलं? : नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक मतदारसंख्या असणाऱ्या नाशिक पश्चिम मतदारसंघात पुन्हा ‘कमळ’ फुलले. महायुतीतील भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांनी एक लाख ४१ हजार ७२५ मते मिळवत विजयाची हॅटट्रिक साधली. येथे १५ उमेदवारांमध्ये आमदार हिरे या एकमेव महिला उमेदवार होत्या. त्यांनी उर्वरित १४ उमेदवारांना पराभूत केल्याने ‘एक नारी, सबपे भारी’ असा नारा देत त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा हिरे यांनी ६८ हजार १७७ मतांनी पराभव केला. बडगुजरांना ७३ हजार ५४८ मते मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिनकर पाटील यांना ४६ हजार ६४९ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यानंतर आता अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याचा दावा करत फेर मतमोजणीची मागणी केली आहे. अनेक मतदारसंघामध्ये मृत व्यक्तींच्या नावाने देखील मतदान झाल्याचा दावा काही मतदारसंघामध्ये करण्यात आला आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार सुधाकर बडगुजर यांची ईव्हीएम मशीनची फेर मतमोजणी मागणी केली होती. ती मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे.

सुधाकर बडगुजर यांनी विधानसभा निवडणुकीत आलेल्या निकालावर आक्षेप घेत फेर मतमोजणीची मागणी केली होती. बडगुजर यांना एकूण केंद्राच्या ५ टक्के केंद्राची फेर मतमोजणी करण्याची अनुमती आहे. फेर मतमोजणीला एकूण खर्च सांगायचा झाला तर, बडगुजर यांना प्रति युनिट ४० हजार आणि १८ टक्के जीएसटी भरुन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ५ टक्के केंद्रांची फेर मतमोजणी करता येणार आहे. बडगुजर यांच्या मागणीनंतर निवडणूक अधिकार तथा जिल्हाधिकाी जलज शर्मा यांनी बडगुजर यांना सूचना पत्र दिलं आहे.

नाशिक पश्चिम मतदारसंघात एकूण दोन लाख ७४ हजार २०८ मतदान झाले होते. यामध्ये १ लाख ४७ हजार ३८२ पुरुष आणि १ लाख २६ हजार ८२३ महिलांसह तीन तृतीयपंथींनी मतदानाचा हक्क बजावला. दोन हजार ३१३ मतदारांनी टपाली मतदान केले होता. शनिवारी मतमोजणीदरम्यान हिरे, बडगुजर आणि पाटील यापैकी कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार याची उत्कंठा वाढली होती. पहिल्या फेरीपासूनच हिरे यांनी मतांमध्ये घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम ठेवली. शेवटच्या तिसाव्या फेरीअखेर त्यांनी ६८ हजार १७७ चे मताधिक्य घेत विजय मिळविला.