फौजदारी कायद्यांमध्ये नवे काहीच नाही

0

नवी दिल्ली(New Delhi), 02 जुलै :- देशातील गुन्हेगारी कायद्यात बदलांसह यातील कलमांचा क्रमही बदलण्यात आला आहे. तीन नवीन कायदे भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम याप्रमाणे संबोधले जाणार आहेत. यावरून काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी(Abhishek Manu Singhvi) तीव्र नाराजी व्यक्त करत टीका केली.

देशभरात नवे फौजदारी कायदे लागू होत आहेत. भारतीय दंड संहिता (आयपीसी) मध्ये 511 कलमे होती. मात्र, आता भारतीय न्याय संहितेत 358 कलमे आहेत. याबाबच अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, या तीन नवीन कायद्यांबाबत ज्या दिवशी राज्यसभेत चर्चा सुरू होती, त्या दिवशी प्रमुख वक्ता होतो. मात्र, तेव्हा अनेक खासदारांच्या निलंबनामुळे माझे भाषण रद्द करण्यात आले. या तीन कायद्यांचा अभ्यास केला, काही गोष्टींचे संशोधन केले. तेव्हा मला असे आढळून आले की, हे दुसरे काहीही नाही. यात नवीन काही नाही. केवळ आपली छाप पाडण्याचा केलेला व्यर्थ प्रयत्न आहे. दुर्दैवाने, कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहे. काही कलमे काढून टाकली आहेत. काही कलमांच्या क्रमात बदल केलेला आहे. 90 टक्के त्याच सगळ्या गोष्टी आहेत. काही शब्द इकडे तिकडे बदलले आणि या सरकारने नवीन कायद्यांचा संच म्हणून पुन्हा लागू केले आहे, अशी टीका सिंघवी यांनी केली.

एक गोष्ट संपूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आली आहे. ती म्हणजे आपल्या न्यायालयातील न्यायाधीश प्रलंबित प्रकरणांशी झडगत आहेत. देशभरातील कनिष्ठ न्यायालयात साडेतीन ते चार कोटी प्रकरणे प्रलंबित आहेत, उच्च न्यायालयांमध्ये सुमारे 60 लाख प्रकरणे प्रलंबित आहेत. तर सर्वोच्च न्यायालयात जवळपास 80 हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. तुम्ही एक स्वल्पविराम किंवा पूर्णविराम बदलल्यामुळे गेल्या 100 वर्षातील केस लॉस आहेत, त्यात सगळ्यात बदल घडतो. नवीन फौजदारी कायद्यामुळे तुम्ही प्रलंबित याचिकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढवण्याला प्रोत्साहन देत आहात आणि याच गोष्टीची मला जास्त काळजी वाटते, असे सिंघवी यांनी सांगितले.