“या चर्चांमध्ये कुठलेही तथ्य नाही”, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

0

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीच्या ४० आमदारांसह सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या घडामोडींवर आपले मौन सोडत या चर्चांमध्ये कुठलेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले (NCP Leader Sharad Pawar on Political Development) आहे. स्पष्टीकरण देताना शरद पवार म्हणाले, “सध्या जी चर्चा तुमच्या मनात आहे, ती आमच्याा कुणाच्याही मनात नाही. या चर्चेला अजिबात महत्त्व नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षात काम करणारे आमचे सगळे सहकारी एका विचाराने पक्षाला शक्तीशाली कसे करायचे या भूमिकेत आहेत. त्याशिवाय दुसरा कुठलाही विचार कुणाच्या मनात नाही”, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी अजित पवार यांच्या पाठिशी असल्याची जाहीर घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा सत्तासंघर्षाचा दुसरा अंक बघायला मिळणार की काय, अशी चर्चा सुरु आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आपले मौन सोडून स्पष्टीकरण दिले. पवार म्हणाले, “मी वर्तमानपत्रात वाचले की आमदारांची बैठक आहे. हे १०० टक्के खोटं आहे. अशी कोणतीही बैठक नाही. पक्षाचे प्रांताध्यक्ष हे सध्या मार्केट कमिट्यांच्या निवडणुकीच्या प्रचारात आहेत. अजित पवारही याच कामात आहेत. मी माझे ठरलेले कार्यक्रम पूर्ण करतोय. मी या सगळ्यावर स्पष्टपणे सांगितल्यानंतर त्यात कुणालाही फाटे फोडण्याचा अधिकार नाही” असेही ते स्पष्टपणे म्हणाले.