
मुंबई : शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधून काही लोक गेले असले तरी काँग्रेस सोडून कोणीही जाणार नाही, काही लोक जाणिवपूर्वक अफवा पसरवत आहेत. गद्दारांना सर्वजण गद्दारच दिसत असतात मात्र काँग्रेसमध्ये कोणी गद्दार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट (MPCC President Nana Patole) केले आहे.
टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सत्तेच्या जोरावर भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष फोडत आहे. भाजपाला विरोधी पक्षच नको आहेत म्हणून विरोधी पक्षात फुट पाडून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. भाजपाचे हे फोडाफोडीचे राजकारण सर्वसामान्य जनतेला आवडलेले नाही म्हणूनच फुटीर नेत्यांच्या मतदारसंघात त्यांना पाठिंबा मिळत नसल्याचे चित्र आहे. शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना नेहमीच महत्वाची पदे दिली, संघटनेत महत्वाची जबाबदारी दिली, दहा वर्षे केंद्रीय मंत्रिपद दिले, लोकसभेला पराभव झाल्यानंतर राज्यसभेवर पाठवले तेच पटेल आज शरद पवार यांच्यावर आरोप करत खालच्या पातळीची भाषा वापरत आहेत.
अधिवेशनात शेतकरी, बेरोजगारी, महागाईचे मुद्दे..
अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकरी संकटात आहे, सरकारने मदत जाहीर केली पण ती मिळालेली नाही. सोयाबीन, कांदा, केळी पिकाला भाव नाही तर कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडूनच आहे. जून महिना संपला तरी अजून पेरण्या झालेल्या नाहीत. या प्रश्नांवर पावसाळी अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे अशी काँग्रेसची भूमिका आहे. १७ तारखेपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात पहिल्या दिवशीच महागाई, बेरोजगारी तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन सरकारला जाब विचारू असे पटोले म्हणाले.