
नवी दिल्ली : पैसे घेऊन लोकसभेत प्रश्न विचारण्याच्या प्रकरणात सदस्यत्व गमावणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्यावरील कारवाईला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज (Supreme Court) नकार दिला. या प्रकरणी आता मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात पुढील सुनावणी होणार असली तरी न्यायालयाच्या या निर्णयामुळे मोईत्रा यांना पुढील महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होता येणार नाही.
मोईत्रा यांनी लोकसभेच्या कामकाजात सहभागी होण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महुआच्या याचिकेवर सुनावणी करताना त्यांना लोकसभेच्या कामकाजात सहभागी होण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आदेश देण्यास नकार दिला. अदानी समूह आणि पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी मोईत्रा आणि व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्यामध्ये पैशाचा व्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मोईत्रांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा सचिवालयाकडून उत्तर मागितले आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी होईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.