विजयासाठी पुढे व्हायचे तमा न आता कष्टांची।

0

*।। विजयच विजय।।*

विजयासाठी पुढे व्हायचे तमा न आता कष्टांची ।

पिढयापिढया मग गातिल तेव्हा गाथा आमुच्या विजयाची ।।

काही लोक असे म्हणतील की, आपण आपला हिंदुराष्ट्राचा विचार मांडला तर सर्व लोकांना तो मान्य होणार नाही. परंतु या सत्याची घोषणा काही लोक आज मान्य करोत वा न करोत, त्यामुळे काही बिघडत नाही. आपला दृष्टिकोन जर स्पष्ट असेल आणि त्यासंबंधी आपल्या मनात ठाम विश्वास असेल, तर आग्रहाने ते मांडल्यावर त्या सत्याचा लोक स्वीकार करू लागतील. आपल्यापैकी सर्वानाच अनुभव आहे आणि मलाही असा विश्वास आहे की लोक ते मानतात.

जर कोणी म्हणत असेल की, मी असा विश्वास मानायला तयार नाही तर ती त्याची दुर्बलता आहे. आपापल्या क्षेत्रामध्ये विशेषकरून आपला सुस्पष्ट विचार व भावना अधिकाधिक प्रमाणात लोकांना समजावून सांगितल्या तर नवेनवे लोक आपल्या जवळ येतील. परंतु जर आपणच आपले मन कमकुवत करून आपल्या ध्येयासंबंधी गुळमुळीत भाषेत बोलायला सुरूवात केली तर मग सगळे संपलेच म्हणून समजा आणि मग ते आपल्या ध्येयाला पोषक ठरण्याऐवजी एका संकटाला आमंत्रण देण्यासारखे ठरेल.

अशा संकटग्रस्त परिस्थितीमध्ये समाजाचे एकीकरण व राष्ट्रीयत्वाची जागृती हे कार्य पुर्णपणे करण्यात आपण यशस्वी झालेलो नाही. पण जितक्या जास्त प्रमाणात हे काम पुर्ण करून सर्वाच्यासमोर आपल्या कामाचा एक पक्का आदर्श म्हणून उभा करू तितक्या प्रमाणात परकीय हस्तक्षेप कमी होऊन देशात एकात्मतेचे आणि परस्पर स्नेहाचे वातावरण पहावयास मिळेल. आपली ही जबाबदारी ओळखून आपल्या कार्याचा सर्वकष विचार केला पाहिजे आणि आपल्या कामाच्या विस्तारासाठी आपल्या सर्व कार्यकर्त्यानी चहूकडे चाललेल्या आपल्या कामामध्ये गुंतून गेले पाहिजे. आपापल्या क्षेत्रामध्ये या दृष्टीने पुर्णपणे प्रयत्न करावा.

त्याचवेळी आपण हेही लक्षात ठेवले पाहिजे की, शाखांशिवाय आपण निरनिराळया प्रकारची कामे करू शकणार नाही. ज्या ठिकाणी आपली शाखा चांगल्या पध्दतीने चालते, त्या ठिकाणी आपण कोणतेही कार्य हाती घेतले तरी ते अगदी निश्चितपणे यशस्वी करू शकतो. म्हणून संघशाखेचे कार्यक्रम, ते राबवण्याची पध्दत, स्वयंसेवकांचे आचरण, स्वयंसेवकाचे स्वभाव तसेच त्यांच्यातील गुणांचा विकास इत्यादी सर्व गोष्टींकडे लक्ष देवून त्याचा प्रसार व दृढीकरण करण्याचा एकाग्र चित्ताने प्रयत्न केला पाहिजे. असे आपण केले तर सर्व क्षेत्रात आपण विजय प्राप्त करू शकू. हे काम आपण जितके मनापासून आणि चिकाटीने करू, तितक्या प्रमाणात आपल्याला दूरदूरपर्यत विजयच विजय मिळेल, हे मी पूर्ण विश्वासाने सांगतो आहे.

(रा.स्व.संघ व्दितीय सरसंघचालक प.पू.श्री.गोळवलकर गुरूजी यांचे भारतीय विचारधन पुस्तकातुन संक्षिप्त लेखन नित्य प्रेरणा पुस्तकातून)