

सोलापूर (Solapur), 6 ऑगस्ट जिल्ह्यात २०१९, २०२० व २०२२ या वर्षी भीमा नदीकाठी (Bhima river)पूरस्थिती निर्माण झाली होती. पुणे जिल्ह्यातील पावसामुळे उजनीत विसर्ग वाढला आणि सोलापूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडतो, त्यावेळी हमखास भीमा नदीकाठी पुराचा धोका निर्माण होतो. संभाव्य धोक्याचा अंदाज घेऊन सोलापूर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन व नैसर्गिक आपत्ती कक्ष अद्ययावत असायला हवेत. मात्र, पूरस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी पुरात बोट चालविण्याचे कौशल्य जिल्ह्यात अवघ्या तिघांकडेच असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
उजनी ते पंढरपूर (Pandharpur)११० कि.मी. भीमा नदीचे पात्र असून, पुढे अक्कलकोटपर्यंत भीमा नदीचे पात्र आहे. सध्या वीर धरणातून भीमा नदीपात्रात ३३ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले असून, उजनी धरणातूनही एक लाख दहा हजार क्युसेकपर्यंत पाणी सोडण्यात आले आहे. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ते पाणी पंढरपूरपर्यंत पोचेल. त्यावेळी पंढरपूरसह नदी काठावरील काही गावांना पूरस्थिती जाणवेल, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.