
मुंबई (Mumbai),: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच भावांच्या तीन जोड्या आणि भाऊ-बहिणी विधानसभेत पोहोचल्या आहेत. हे सर्व उमेदवार महायुतीचे उमेदवार होते.
खासदार नारायण राणे (MP Narayan Rane) यांचे पुत्र नितेश राणे (Nitesh Rane) कणकवलीतून, निलेश राणे (Nilesh Rane) कुडाळमधून जिंकले आहेत. दोघे सख्खे भाऊ विधानसभेत जाणार आहेत. तर, राणेंच्या घरात एक खासदार आणि दोन आमदार अशी सत्ता असणार आहे. शिवसेनेचे नेते उदय सामंत रत्नागिरीतून, तर त्यांचे बंधू किरण सामंत राजापूरमधून विजयी झाले आहेत. वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई आणि वरळीतून आदित्य ठाकरे हे विजयी झाले आहेत. वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरेंचे मावस भाऊ आहेत. रश्मी ठाकरे यांच्या मोठ्या बहिणीचे ते पुत्र आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे दिलीप वळसे पाटील हे आंबेगावमधून तर त्यांची बहीण सई डहाके या कारंजामधून भाजपकडून विजयी झाल्या आहेत. रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे हे भोकरदनमधून विजयी झाले आहेत. तर, कन्या संजना जाधव या शिवसेनेकडून कन्नडमधून विजयी झाल्या आहेत. भाजपचे शिवाजीराव कार्डिले राहुरीमधून जिंकले आहेत, तर त्यांचे जावई संग्राम जगताप अहमदनगर शहरमधून विजयी झाले आहेत.
दरम्यान तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात सर्वांत कमी वयाचा आमदार निवडून आला आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत झाली. यात माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे. रोहित पाटील यांचे वय 25 वर्षे असून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे.
















