ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे कार्य प्रेरणादायी : कल्याणी कापसे अभ्यासवर्गास उत्स्फूर्त प्रतिसाद

0

नागपूर (Nagpur) :- 
ग्राहकांच्या समस्यांकडे जातीने लक्ष ठेवून कार्यकर्त्यात अभ्यासवर्गाद्वारे ग्राहक जागृतीची प्रेरणा निर्माण करण्याचे ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे कार्य प्रशंसनीय असल्याचे मत राज्य ग्राहक आयोगाच्या पीठासीन सदस्या कल्याणी कापसे यांनी व्यक्त केले. प्रमुख अतिथी म्हणून भूमेश रिअल्टर्सचे संचालक भूमेश पेशने उपस्थित होते.
कल्याणी कापसे यांनी, ग्राहक संरक्षण कायदा 2019 चा सविस्तर आढावा घेतला. सेवा व वस्तूंच्या त्रुटींबाबत तक्रारींचे स्वरूप समजावून सांगताना, तक्रार निवारणासाठी खात्रीशीर बिलाची आवश्यकता स्पष्ट केली.
विदर्भ प्रांत अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर यांनी ग्राहक आयोगातील प्रलंबित प्रकरणांवर चिंता व्यक्त करत, मध्यस्थ कक्ष स्थापन करून प्रकरणे तातडीने निकाली काढण्याची गरज अधोरेखित केली. वकिलांच्या निष्क्रियतेमुळे होणाऱ्या विलंबाकडे त्यांनी लक्ष वेधले.

ग्राहक हक्क, संरक्षण कायदे, डिजिटल सुरक्षितता, वीज व मापनविषयक जागृती तसेच संघटन कौशल्य या विविध विषयांवर अभ्यासपूर्ण सत्रांद्वारे साधकांना मार्गदर्शन करण्यात आले. नागपूर जिल्हा, ग्रामीण, अमरावती आणि गोंदिया परिसरातून सुमारे 70 साधकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद व ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमापूजनाने झाली. ग्राहक गीताचे सादरीकरण करण्यात आले.
प्रास्ताविकात, विदर्भ प्रांत संघटक डॉ. कल्पना उपाध्याय यांनी ग्राहक पंचायत ही लोकहितवादी, राजकारणमुक्त चळवळ असल्याचे अधोरेखित केले. घरगुती, व्यवसायिक आणि औद्योगिक ग्राहकांचे वर्गीकरण व तक्रार निवारण यंत्रणेबाबतही त्यांनी माहिती दिली.

दुसऱ्या सत्रात वैध मापन विभागाचे विभागीय नियंत्रक पांडुरंग बिरादार यांनी वजन-मापातील फसवणुकीचे प्रात्यक्षिकांसह सादरीकरण करत, ग्राहक कार्यकर्त्यांच्या मानसिक, आर्थिक व भावनिक सक्षमतेवर भर दिला.
सायबर सुरक्षा सत्रात ॲड. महेंद्र लिमये यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल अरेस्ट, ऑनलाइन फसवणूक, बँक व्यवहारांवरील धोके यावर प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांनी डेटा सुरक्षिततेचे महत्त्वही अधोरेखित केले.
संघटन कौशल्य सत्रात नागपूर जिल्हा सचिव मुकुंद अडेवार यांनी कार्यकर्ता व संघटनेच्या परस्परावलंबित्वावर प्रकाश टाकत, अहंभाव टाळण्याचे आवाहन केले. नागपूर ग्रामीण अध्यक्ष कांचनमाला माकडे यांनी विद्यार्थी ग्राहक जागृतीची गरज अधोरेखित केली.

स्मार्ट मीटर व महावितरणशी संबंधित सत्रात अभियंता लीलाधर लोहरे यांनी ग्राहकांच्या शंका निरसन करत, बिलवाढीच्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून स्मार्ट मीटर बाबतीत ग्राहक जागृती कार्यक्रम होणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी नागपूर जिल्हाध्यक्ष रेखा भोंगाडे यांनी अभ्यासवर्गाच्या यशस्वितेवर समाधान व्यक्त करीत, इतर जिल्ह्यांनी देखील अशा उपक्रमांचे अनुकरण करावे असे मत मांडले. नागपूर जिल्हा संघटक अर्चना पांडे व कांचनमाला माकडे यांनी सत्रांचे संचालन केले. आभारप्रदर्शन विदर्भ प्रांत सचिव लीलाधर लोहरे यांनी केले.
यावेळी ॲड. पल्लवी खापरीकर, नितीन मुकेवार, निकेश कावळे, स्मिता मुकेवार, रीमा उईके, उज्ज्वला शहारे, चंद्रशेखर शहारे, ॲड. सुभाष बोर्डेकर, स्वाती अडेवार, ऊर्मिला बोरीकर, डॉ. कारिया, शिल्पा मेश्राम, प्रशांत लांजेवार, ॲड. नलिन मजिठिया, सुविधी जयस्वाल, वैशाली तळवेकर, नथुजी वांढरे, श्रीराम सातपुते, मोरेश्वर माकडे, सुनीता मानकर, राहुल दळवी, धनराज निकोसे, प्रा. चंद्रशेखर बरडे, डॉ. रीना जांभुळकर, मीना मदन इंदुरकर, अनिल बजाईत, सचिन कुरडकर, विष्णूजी डहाके, गजानन ढगे, सुभाष चिखले, योगराज डोंगरे, महेश बोंद्रे, सोनल बागडे, संजय जवाहर, राहुल कान्होळकर, रुपेश बोंद्रे, विना पोकळे, डॉ संजीवनी चौधरी, सुजितराव ढोक, प्रमोद सिन्हा, निलेश घोंगडे, प्रिया घोंगडे, बापूराव तालन, अलकाताई घोडेस्वार (अमरावती), सुशील मानकर, शारदा सोनकनवरे, आशिष तुरकर (गोंदिया), दीपक परांजपे, मोहम्मद नजर उपस्थित होते.