पूजा करायला सांगून महिलेने मुलाला ढकलले विहिरीत

0

 

वर्धा – 12 वर्षीय बालकाला पूजा करायला लावून विहिरीत ढकलल्याची खळबळजनक घटना वर्ध्याच्या नालवाडी येथील नागसेन नगर परिसरात घडली. सुदैवाने हा बालक विहिरीतून दोरीच्या सहाय्याने बाहेर आला. मुलाच्या घरच्यांना हा सर्व प्रकार समजल्यानंतर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वर्ध्याच्या नालवाडी येथील नागसेन नगर परिसरात बारा वर्षीय बालक हा त्याच्या आजीकडे राहतो. 21 जानेवारी रोजी मुलगा हा भिजलेल्या कपड्यात, घाबरलेल्या अवस्थेत घरी आला. घरच्यांनी विचारले असता, त्याने सर्व घटना घरच्यांना सांगितली. घरासमोरील मैदानावर पतंग उडवत असताना जवळच राहणारी महिला आरोपी काम पाहण्याच्या बहाण्याने मुलाला सोबत घेऊन गेली. नागसेन नगर मधील रोडच्या बाजूला असलेल्या विहिरीजवळ मुलाला नेले. व विहिरीला शेंदूर लावायला सांगितला, फुल टाकायला सांगून प्रथम छोटा व नंतर मोठा दगड विहिरीत टाकायला सांगितला, मुलगा हा शेंदूर लावत असताना आरोपी महिलेने मुलाला विहीरीत ढकलून दिले व महिला तेथून पसार झाली. विहिरीत पाईपला बांधून असलेल्या दोरीच्या मदतीने मुलगा बाहेर आला, व त्या ठिकाणाहून मुलाने सरळ घर गाठले. अखेर तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यामध्ये अपहरण करून जिवे मारण्याचा व इतर गुन्हे आरोपी विरुद्ध नोंदवण्यात आले.