इंडी आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह

0

 

2024 च्या लोकसभा निवडणुकीची उपान्त्य फेरी मानली गेलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकींचे निकाल आता लागले आहेत.त्यावर साधकबाधक चर्चा सुरू राहणार असली तरी घटना इतक्या वेगाने घडत आहेत व घडणार आहेत की, त्यामुळे आता 2024च्या लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू होणे अपरिहार्यच आहेत.तिच चर्चा येत्या सहा डिसेंबरच्या इंडी आघाडीच्या बैठकीतून सुरू होणार आहे.तिचा संकेत कालच भाजपा मुख्यालयात झालेल्या विजयसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यानीही दिला आहे.त्यासाठी त्यानी ‘उपान्त्य फेरीतील निकालांनी हॅटट्रिक केली आहे तर ही हॅटट्रिक 2024च्या लोकसभा निवडणुकीतील हॅटट्रिकचा संकेत देणारी आहे’ या शब्दांचा वापर केला. पंतप्रधानांच्या या शब्दातच पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मर्म स्पष्ट झाले आहे .

इंडी आघाडीच्या गेल्या काही महिन्यातील हालचालीनी व वरिष्ठ नेत्यांच्या उलटसुलट वक्तव्यानी आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे होत होते पण या निवडणुकीतील पराभवाने तिच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.त्याचा संकेतच जणू चार डिसेंबर रोजी आन्ध्र प्रदेश काॅग्रेस आमदारांच्या वादपूर्ण बैठकीने दिला आहे.वस्तुतः काॅग्रेसच्या आंध्र प्रदेशातील विजयाचे शिल्पकार रेवंत रेड्डी यांचीच मुख्यमंत्रिपदी एकमताने निवड होणे अपेक्षित होते.पण ती औपचारिकता पूर्ण होण्याआधीच तेथे मुख्यमंत्रिपदासाठी लठ्ठालठ्ठी सुरू झाली.त्यात बिचारे रेवंत रेड्डी मागे पडले आणि तीन-चार नावे समोर आली.शेवटी नेत्याच्या निवडीची नवनिर्वाचित आमदारांची बैठक पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे अधिकार सोपवून पार पडली.पण या घटनेने हे स्पष्ट केले आहे की, खरगे यांनाही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरविणे अतिशय जड जाणार आहे.

अर्थात ही घटना काॅग्रेस पक्षांतर्गतच बाब नाही.इंडी आघाडीत 2024च्या लोकसभा निवडणुकीतील जागावाटपापासून तर उमेदवार निश्चितीपर्यंत हेच घडणार आहे.

इंडी आघाडीचे होश ठिकाणावर आल्याचा दुसरा संकेत संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मिळाला असला तरी या बैठकीतील समाजवादी पक्षाची अनुपस्थिती आघाडीतील आगामी लठ्ठालठ्ठी अधोरेखित करून गेलीच.अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी परंपरेनुसार झालेल्या पत्रकार संवादात पंतप्रधानानी ‘ निवडणुकीतील पराभवाचा राग सांसदीय चर्चेवर काढू नका’ हा सल्ला अपेक्षित परिणाम साधून गेला.कारण खरगे यांच्या निवासस्थानी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत ‘ कोणत्याही स्थितीत सभागृहातील कामकाज बंद न पडण्याचा’ निर्णय घेण्यात आला.या पार्श्वभूमीवर सहा डिसेंबरच्या निकालांनंतरच्या पहिल्या बैठकीत काय घडू शकते याचा अंदाज येऊ शकतो.पण तेलंगणातील घटना व समाजवादी पक्षाची अनुपस्थिती आघाडी निवडणूक निकालातून बोध घ्यायला पुरेशी तयार झालेली नाही हेच स्पष्ट होते.कारण 543मतदारसंघातील पक्षशः जागावाटप, त्यानंतर होऊ शकणारी विविध पक्षातील उमेदवार निश्चिती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आघाडीचे नेतृत्व या अतिशय कठिण मुद्यांचा सोक्षमोक्ष आघाडीला लावावा लागणार आहे व त्यावरून तिच्यासमोर केवढी प्रचंड आव्हाने आहेत हे अधोरेखित होते.

खरे तर आपल्या ऐक्याबद्दल मतदाराना आश्वस्त करण्याची नामी संधी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीमुळे एन्डी आघाडीला व विशेषतः काॅग्रेस पक्षाला नामी संधी प्राप्त झाली होती. पण त्या पक्षाने ती पक्षीय स्वार्थासाठी हातातून गमावली.तशी अन्य मित्रपक्षाना पाचही राज्यांमध्ये काही जागा देण्याचा प्रश्नही नव्हता.समाजवादी व आम आदमी पार्टीला सामावून घेण्याचा प्रयत्न तिने केला असता तर आघाडीच्या ऐक्याचा संदेश जनमानसात पसरविता आला असता.पण पंतप्रधानपदाच्या उमेदवारीविषयीचा आपला दावा अधिक मजबूत करण्याची गरज काॅग्रेस पक्षाला वाटली.
याच रणनीतीचा एक भाग म्हणून आघाडीतील अन्य पक्षांच्या शीर्षस्थ प्रचारातही उतरविता आले असते पण ती संधीही आपल्या पक्षीय अहंकाराने काॅग्रेसने घालविली.त्यामुळे त्याने एकीकडे समाजवादी व आपला नाराज केले तर दुसरीकडे नितीशकुमार, शरद पवार यांच्यासारख्या नेत्यानाही नाराज केले.परिणामी अखिलेश यादव व ममता बॅनर्जी आघाडीतील फटकून वाचल्यानंतर तर त्याना दोष देता येणार नाही.

या पार्श्वभूमीवर उद्या दिनांक सहा डिसेंबर रोजी खरगे यांच्या निवासस्थानी विरोधी नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.त्यात काय घडते हे कळायला खूप प्रतीक्षा करावी लागणार नाही.त्यात कोणतेकोणते नेते सहभागी होतात आणि कोण कोण कोणते मुद्दे मांडतात की, भांडतच राहतात हे स्पष्ट होईल.

ल.त्र्यं. जोशी
ज्येष्ठ पत्रकार नागपूर