ताडोबातील ‘त्या’ गिधाडाचा दुर्दैवी मृत्यू 

0

ताडोबातील ‘त्या’ गिधाडाचा दुर्दैवी मृत्यू 

नागपूर : काही दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा पासून विविध राज्ये पालथी घालत थेट तामिळनाडू पर्यंतचा सुमारे चार हजार किलोमीटरचा प्रवास केलेल्या ‘एन-११’ या गिधाडाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे (tadoba vulture)

गुरुवारी या गिधाडाचा मृतदेह पुडुकोट्टई विभागातील अरिमलम थंजूर गावातील तिरुमायम वनपरिक्षेत्रामधील वीज वाहक तारांच्या खाली आढळला.

या गिधाडाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह तामिळनाडूमधील अरिमलम थंजूर या गावातगुरुवार दि. १६ जानेवारी रोजी आढळला.

उचांवरुन जाणाऱ्या विजेच्या उंच तारा भूमीगत करण्याचे किंवा त्यावर बर्ड डायव्हर्टर लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच दिले आहेत. या तारांमध्ये अडकून विजेचा धक्का लागून माळढोक, तणमोर आणि गिधाडांसारख्या पक्ष्यांचा जीव जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. ‘एन-११’ या गिधाडाचा देखील त्यात आता समावेश झाला आहे.

‘बीएनएचएस’ने या गिधाडाची पैदास पिंजोर येथील गिधाड प्रजनन केंद्रात केली होती. ऑगस्ट महिन्यात या गिधाडाला ‘जीपीएस टॅग’ लावून ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले होते. त्यानंतर या गिधाडाने महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, आंधप्रदेश या राज्यातून चार हजार किलोमीटरचा प्रवास करुन तामिळनाडू गाठले होते. गेल्या तीन आठवड्यांपासून हे गिधाड कलसपाक्कम तालुक्यात वास्तव्यास

होते.

गेले काही दिवस या गिधाडाचे एकाच जागेवरील लोकेशन मिळत असल्याने बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या माध्यमातून शोधमोहीम राबवली गेली आणि त्यातच या गिधाडाचा जळालेला मृतदेह आढळून आल्याचे ‘बीएनएचएस’चे संचालक किशोर रिठे यांनी सांगितले. उंच टाॅवरच्या वीजेच्या तारांना स्पर्श झाल्याने हा मृत्यू झाला असण्याची शक्यता किशोर रिठे यांनी वर्तवली आहे. गिधाडाचा मृतदेह वन विभागाच्या तिरुमायम रेंजच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला आणि सहाय्यक पशुवैद्यकीय शल्यचिकित्सकांनी त्याचे शवविच्छेदन केले आहे.