

विजेच्या खांबाला ट्रॅक्टरची धडक, सुदैवाने जिवीतहानी टळली
भिडी (Bhidi) : – विजेच्या खांबाला ट्रॅक्टरने जबर धडक दिल्याने प्रवाहित तारांसह विजेचा खांब देखील उन्मळून पडल्याची घटना देवळी तालुक्यातील भिडी येथे आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही, परंतु ट्रॅक्टरवरील मजूरांसह परिसरातील नागरिकांवर मात्र यावेळी वाचलो रे बावां..! असे म्हणण्याची पाळी नक्कीचं आली.
भिडी येथील तळणी मार्गावरील वार्ड क्रमांक तीन मधल्या भरवस्तीत एका विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने विजेच्या खांबाला जबर धडक दिली. सकाळी सात वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेत विजेच्या ताराही तुटल्या आणि खांब देखील उन्मळून पडला. यावेळी नागरिकांनी मात्र सतर्कता बाळगत विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात आणि विज प्रवाह बंद करण्यात आला. याठिकाणी गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांची नेहमीच वर्दळ असते. एका राजकीय पक्षाच्या गावपुढाऱ्याचा सदर दुर्घटनाग्रस्त ट्रॅक्टर असल्याचे सांगितले जाते. त्याच्या ट्रॅक्टर अथवा ट्रॉलीला कोणत्याही प्रकारचा क्रमांक नाही हे विशेष.. त्यामुळे याठिकाणी अवैध वाहतूकीसाठी अशा क्रमांक नसलेल्या वाहनांचा उपयोग होत असल्याचे दिसून येते. सदर घटनेनंतर लगेच वाहनाच्या मालकाने त्याठिकाणी जेसीबी आणून आपले वाहन रफादफा केले. परंतु विज वितरण कंपनीचे अधिकारी ज्यावेळी घटनास्थळी पोहचलेत, त्यावेळी मात्र अपघातग्रस्त वाहन सोयीस्करपणे गायब झाले होते. त्यामुळे संबंधित राजकीय पुढाऱ्याला शोधण्याचे आव्हान विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.
यासंदर्भात महावितरणचे कनिष्ठ अभियंता हेडाऊ यांनी त्या गावपुढाऱ्याचा शोध घेऊन त्यांच्याकडून नुकसान भरपाई देखील वसूल करीत कारवाई करणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.