‘हिंदुत्व ‘ शब्दावर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब

0

सारांश
‘हिंदुत्व ‘ शब्दावर सर्वोच्च
न्यायालयाचे शिक्कामोर्तब

भारतीय संविधानातील ‘ हिंदुत्व एक जीवनपद्धती ( वे ऑफ लाईफ) हा उल्लेख गाळून त्या ऐवजी तेथे ‘ भारतीय संविधानत्व ‘ किंवा भारतीय राज्यघटना हा शब्द टाकावा अशी विनंती करणारी डाॅ. एस. एन. कुन्द्रा नावाच्या नागरिकाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.भारताचे सरन्यायाधीश न्या.धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा निर्णय दिला. न्या.पारडीवाला व न्या.मनोज मिश्रा यांचा या खंडपीठात समावेश होता.
डाॅ.कुन्द्रा यांच्या वतीने कुणाही वकिलाने युक्तिवाद न करता स्वतः त्यांनीच युक्तिवाद केला.ते म्हणाले की, शाहबानो प्रकरणासह अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयाने हिंदुत्व ही एक जीवनपद्धती आहे असा उल्लेख केला आहे.तो घटनेतील ‘ धर्मनिरपेक्षता ‘ या शब्दाला छेद देणारा आहे.त्यामुळे तो रद्द करून त्या ठिकाणी ‘ भारतीय संविधानत्व ‘ हा शब्द टाकावा. यावेळी डाॅ.कुंद्रा व न्यायमूर्ती यांच्यात असा संवाद झाला.तो स्वयंस्पष्ट आहे.
न्या. चंद्रचूड म्हणाले ” तर तुमचे म्हणणे असे आहे की, संविधानात हिंदुत्व या शब्दाऐवजी भारतीय संविधानत्व म्हणजे इंडियन काॅन्स्टीट्युशन हा शब्द टाकावा.

डाॅ.कुन्द्रा : सर मला दोन मिनिटे युक्तिवादासाठी द्या.
न्या.चंद्रचूड नकार देतात.
डाॅ. कुन्द्रा: सर एक मिनिट द्या.
न्या.चंद्रचूड: हा न्यायालयीन प्रक्रियेचा दुरूपयोग आहे. याच याचिकाकर्त्याने 2022 मध्ये याचिका दाखल करताना काही फॅक्ट्स न्यायालयापासून लपविल्या होत्या.
सरन्यायाधीश तेवढ्यावरच थांबले नाहीत.आपले अजेंडे पुढे सरकवण्यासाठी न्यायालयीन प्रकियेच्या वाढत्या गैरवापरावरही त्यांनी तीव्र ताशेरे ओढले.मुंबई उच्च न्यायालयाने कुंद्रा यांना पाच लाखांचा दंड ठोठावल्याचे सरन्यायाधिशांनी समर्थनही केले.

अर्थात हिंदुत्वाचा मुद्दा प्रथमच सर्वोच्च न्यायालयात गेला असे नाही.दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना मुंबईत विलेपार्ले मतदारसंघातून विधानसभेची एक पोटनिवडणूक झाली होती.त्यात रमेश प्रभु हे सेनेचे उमेदवार होते व ते विजयीही झाले होते.त्यांच्या विजयाला जेव्हा न्यायालयात आव्हान देण्यात आले तेव्हा त्यांच्यावर हिंदुत्वाचा प्रचार करण्याचा आरोप झाला तेव्हा न्यायालयाने तो फेटाळला होता व बाळासाहेबांनी त्याचे हिंदुत्वाचा विजय म्हणून स्वागतही केले होते.

‘ हिंदुत्व ही एक जीवनपद्धती आहे’ ( वे ऑफ लाईफ) असा उल्लेख एके काळी गाजलेल्या शहाबानो खटल्यातही झाला होता. योगायोग असा की, त्या खटल्यातील एक न्यायमूर्ती म्हणजे भारताचे माजी सरन्यायाधीश स्व.यशवंतराव चंद्रचूड यांचाही समावेश होता.ताजा निर्णय देऊन विद्यमान सरन्यायाधीश न्या.धनंजय चंद्रचूड यांनी एकप्रकारे आपल्या पिताश्रींच्या म्हणण्याला दुजोराच दिला आहे.अर्थात न्यायालयाचा प्रत्येक निर्णय हा त्या प्रकरणातील वस्तुस्थिती व कायदा या आधारावरच होत असतो हे वेगळे सांगण्याची गरज नसावी.

ताज्या निर्णयामुळे हिंदुत्वाचा संबंध जातीयवाद आणि धर्मान्धता यांचा उठसूठ जोडण्याचा प्रयत्न करणार्या ढोंगी धर्मनिरपेक्षतेचा पुकारा करणार्यांचे दात मात्र घशात गेले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शब्दात सांगायचे झाल्यास ‘ जे जे उदात्त ‘ म्हणजे हिंदुत्व.हिंदु हा एक धर्म आहे पण तो इस्लाम, ख्रिस्ती यांच्यासारखा ‘ रीलिजन मात्र नाही.रीलिजन वेगळा आणि धर्म वेगळा. रीलिजनमध्ये एकच प्राॅफेट असतो, वागण्याचे कडक निर्बंध असतात.ते मोडणार्यांना शिक्षेची तरतूदही असते. रीलिजन हा मुळातच फंडामेंटलिस्ट असतो.हिंदु म्हणविल्या जाणार्या धर्मात असे काहीच नाही.तेथे देवतांची संख्या वाढत वाढत तेहेतीस कोटींवर गेली आहे.प्रत्येक व्यक्तीत ‘ अनलेस प्रुव्हड इट अदरवाईज ‘ देवत्व आहे अशी त्याची धारणा आहे.विशिष्ट वेषभूषेचा, कर्मकांडाचा आग्रह नाही.आडवे गंध लावणारा वा उभे गंध लावणारा तोच हिंदु अशीही व्याख्या नाही.गंध न लावणाराही हिंदुच असतो.सदाचरण, बंधुभाव, परस्पराना अडचणीच्या वेळी मदत करण्याची वृत्ती ही हिंदुत्वाची अशी किती तरी लक्षणे आहेत.खर्या अर्थाने ती एक जीवनप्रणाली आहे, आचारप्रणाली आहे एवढाच त्याचा अर्थ.त्यावरच सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.हा एकप्रकारे हिंदुत्वाचा विजयच आहे.
ल.त्र्यं.जोशी
ज्येष्ठ पत्रकार नागपूर