शहराच्या चौफेर प्रगतीसाठी नागपूरकरांची साथ हवी

0

केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांचे ‘लाईव्ह’ संवादातून आवाहन

नागपूर – नागपूरच्या प्रत्येक भागात विकासकामे झाली. नागपूरच्या प्रगतीचा हा फक्त ट्रेलर आहे. मला आणखी बरीच कामे करायची आहेत आणि शहराच्या चौफेर प्रगतीसाठी मला नागपूरकरांची साथ हवी आहे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (बुधवार) लाईव्ह संवादाच्या माध्यमातून केले. (The support of the people of Nagpur is needed for the all-round progress of the city)

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी रामनवमीच्या शुभेच्छा देऊन संवादाला सुरुवात केली. ते म्हणाले, ‘आज शहरात सर्वत्र काँक्रिटचे रस्ते होत आहेत. बहुतांश भागातील रस्ते उत्तम झालेले आहेत. ज्या भागांमधून रेल्वेलाईन जाते, त्याठिकाणी आपण भुयारी मार्ग तयार केले आहेत. आता रिंग रोडवर ट्रॉली बस सुरू करण्याची तयारी आपण करतोय. शहरातील आऊटर रिंगरोडही जवळपास पूर्ण झालेला आहे. नागपुरात ४०० झोपडपट्ट्या आहेत आणि काही अनधिकृत ले-आऊट्स आहेत. बांगलादेशमध्ये आपण मालकी हक्काचे पट्टे दिले असून इतर भागांमध्येही ही योजना राबविण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यातून गरिबांना स्वतःच्या मालकीची घरे मिळतील.’

नागनदीचा २४०० कोटींचा प्रकल्प मंजूर झालेला आहे. आपले शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त व्हावे, यासाठी प्रयत्न आहे. यावर्षी पावसाळ्यात स्वस्त दरातील संत्र्याची कलम घेऊन नागपूरकरांना देण्याचा माझा प्रयत्न असेल. प्रत्येक घरी एक संत्र्याचे झाड असावे, असे आवाहन करणार आहे, असेही ते म्हणाले. एम्प्रेस मिलच्या जागेवर १५ लाख फुटांचे टेक्सटाईल मार्केट आपण करणार आहोत. इथे पार्किंगची उत्तम व्यवस्था असेल. याच इमारतीत दीडशे ते २०० रेडीमेड दुकानांसाठीही जागा देणार आहे. त्यामुळे महाल-इतवारी भागातील व्यावसायिकांना उद्योग वाढीला मदत होईल, याचाही ना. श्री. गडकरी यांनी उल्लेख केला. सिम्बायोसिस, एम्स, पाच मेडिकल कॉलेजेस, ट्रिपल आयटी, आयआयएमच्या माध्यमातून नागपूरला एज्युकेशन हब म्हणून नाव मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.

रोजगार निर्मितीला प्राधान्य

नागपूर शहरात रोजगार निर्मितीला माझे सर्वाधिक प्राधान्य आहे. मिहानमध्ये एचसीएल, टीसीएस, इन्फोसीस, टेक-महिंद्रा या केवळ चार कंपन्यांमध्येच ४० हजार लोकांना काम मिळाले आहे. याशिवाय टालसह इतर कंपन्यांमध्येही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली. आतापर्यंत एक लाख तरुणांना मिहानमध्ये नोकऱ्या मिळाल्या आणि येत्या काळात हा आकडा वाढत जाणार, असा विश्वास ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केला. अँडव्हान्टेज विदर्भच्या टीमने विदर्भातील क्षमता लक्षात घेऊन कोणत्या भागात कुठला उद्योग यायला हवा, याचा अभ्यास केला आहे. त्यादृष्टीने आपण उद्योग सुरू व्हावेत आणि रोजगार मिळावा, यासाठी प्रयत्न होणार आहेत. आंभोरा, ताडोबा, पेंच, कऱ्हांडला या माध्यमातून पर्यटन हब म्हणून नागपूरची ओळख निर्माण झालेली आहे. आता पर्यटनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार निर्माण व्हावा, यासाठी प्रयत्न होणार आहेत, असेही ते म्हणाले.

गरिबांच्या सेवेसाठी डायग्नोसिस सेंटर 

कमाल चौकात माझ्या आईच्या स्मरणार्थ डायग्नोसिस सेंटर होत आहे. इथे सर्व पॅथोलॉजी टेस्ट, एमआरआय, सिटी स्कॅन, एक्स-रे अत्यंत माफक दरात होणार आहे. गोरगरीब जनतेच्या कल्याणार्थ हा उपक्रम हाती घेतला आहे, असेही ना. श्री. गडकरी यांनी सांगितले.