मविआ जागावाटपाचा तिढा सुटला

0

 

शिवसेना २१, राष्ट्रवादी काँग्रेस १०, काँग्रेस १७

मुंबई (Mumbai), ९ एप्रिल: लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अखेर गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर सुटला आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे (शिवसेना) २१, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) १० आणि काँग्रेस १७ जागांवर लढणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी मुंबईत जाहीर केले.

उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मविआतील तिन्ही घटक पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईत पार पडली. गेल्या काही दिवसांपासून सांगली, भिवंडी आणि मुंबईतील जागांवर महाविकास आघाडीमध्ये पेच होता. आज अखेर याबाबत शिक्कामोर्तब झाले आहे. सांगलीची जागा उद्धव ठाकरे यांनाच मिळाली आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडे आणि मुंबई-उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे राहणार आहे.

जागावाटपाचा फॉर्म्युला

शिवसेना २१ – मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य, कल्याण, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, मावळ, हातकणंगले, सांगली, नाशिक, शिर्डी, जळगाव, परभणी, धाराशिव, बुलढाणा, संभाजीनगर, हिंगोली, यवतमाळ-वाशिम

काँग्रेस १७ – मुंबई-उत्तर, मुंबई-उत्तर मध्य, पुणे, नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक

राष्ट्रवादी १० – बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण, बीड