

नागपूर (Nagpur) :- मराठी साहित्याचाच एक भाग मानले जाणारे मराठीतील वैचारिक वाङ्मयविश्व हे ललित साहित्याच्या साथीसंगतीनेच निर्माण होत गेलेले दिसते. काव्य, कथा, कादंबरी, नाटक असा ललित साहित्याचा एक प्रवाह आणि त्यास समांतर वाहणारा निबंध, लेख, प्रबंध, समीक्षा व इतर वैचारिक लेखनाचा दुसरा प्रवाह मराठी भाषेत फार पूर्वीपासून पाहायला मिळतो. प्राचीन मराठीच्या काळात ललित-वैचारिकमध्ये दिसणारी अद्वैतानुभूती ज्ञानदेवांच्या वाङ्मयकर्तृत्वाच्या आधारे पाहता येते. त्यामुळे मराठी समाजाची आणि संस्कृतीची वैचारिक जडणघडण मराठी साहित्यप्रवाहाच्या संतकुलोत्पन्न गंगोत्रीतूनच झालेली स्पष्ट दिसते. आज गतशतकातील जे मराठी विचारविश्व आपल्या पुढ्यात. आहे, त्यातून मराठीचे सांस्कृतिक अधिष्ठान काय आणि त्यात कालपरत्वे, प्रसंगोपात्त झालेली परिवर्तने ती कोणती, याचा शोध आपल्याला घेता येतो. या शोधात विशेषत्वाने गवसते. ते प्राचीन अर्वाचीन विचारानुबंधाचे उंदार, व्यापक, समन्वयशील असे विचारसूत्र ! ज्याचे एक टोक ‘ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरी या गीताभाष्यात आणि पसायदानात, तर दुसरे टोक लोकमान्यांच्या श्रीमद्भगवद्गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र या गीताभाष्यात सापडते.
प्रामुख्याने मराठीतील निबंध वाङ्मयाची परंपरा आणि त्यासोबतच्या वैचारिक ‘वाङ्मयाचा आणि समीक्षेचा प्रारंभ विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या ‘निबंधमाले ‘पासून झालेला आहे. विष्णुशास्त्रांनी (१८५०-१८५२) आपल्या अल्प जीवनकाळात मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीसाठी केलेले कार्य अवर्णनीय स्वरूपाचे ठरते. त्यांची ‘निबंधमाला’ १८७४ मधली. मालेचा शेवटचा अंक १८८६ मध्ये वाचकापुढे आला. आपल्या निबंधातून त्यांनी महाराष्ट्राला आणि मराठी संस्कृतीला स्वदेश, स्वभाषा आणि स्वधर्म यांचे बाळकडू दिले. निबंधमालेतील लेखनातच मराठीतील शैलीदार निबंध वाङ्मयांची आणि मराठी समीक्षेची बीजे सापडतात. विष्णुशास्त्रांच्या थोडे पूर्वी लेखन करणारे गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी (१८२३ ते १८९२) यांनी ‘प्रभाकर’ साप्ताहिकातून लिहिलेल्या ‘शतपत्रा’मध्ये मराठीतील निबंध वाङ्मयाच्या एका विचारप्रवाहाचे सुरुवातीचे टोक आपल्याला सापडते.
लोकहितवादींच्या पाश्चात्यशरण व विदेशी ज्ञानाने दीपलेल्या वैचारिक धारेचा प्रतिवाद करण्याच्या प्रेरणेतूनच विष्णुशास्त्रींची लेखणी मराठीतून तळपलेली दिसते. त्यांच्यापाशी उगम पावलेल्या ‘संस्कृतिनिष्ठ’ आणि ‘संस्कृतिविरोधी’ या दोन वैचारिक धारा आजही मराठी साहित्याच्या आणि विचारांच्या क्षेत्रात विद्यमान दिसतात. वरवर पाहता या दोन्ही धारा परस्परविरोधी वाटत असल्या तरी अंतर्यामी मराठी समाजाची, मराठी भाषेची आणि मराठी संस्कृतीची चिंता वाहणाऱ्या या धारांनीच गतशतकातील मराठी साहित्यविश्व समृद्ध केलेले दिसते. या दोन धारांना परस्परांविरोधी कल्पून तद्विषयक संघर्षात आपली शक्ती क्षीण करणे योग्य नाही. सुदैवाने आज मराठी विचारविश्वातं डॉ. सदानंद मोरे, डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्यासारखे संस्कृतिनिष्ठ लेखक हे भाषेचे भाग्यच मानले पाहिजे.
‘गर्जा महाराष्ट्र या ग्रंथातून हा समन्वयवादी सूर जपणारे डॉ. मोरे म्हणतात, ‘लोकहितवादी गोपाळराव हरी देशमुख आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या मतांमध्ये कमालीची तफावत दिसून येत असली, तरी त्यांच्यातील एक खरा व दुसरा खोटा असे नाही. पहिला इंग्रजी राजवटीच्या पहिल्या पर्वात डोळे दीपून गेलेल्या प्रामाणिक माणसांचे प्रतिनिधित्व करतो. तर दुसरा याच राजवटीच्या दसऱ्या पर्वात डोळे उघडलेल्या माणसांचे प्रतिनिधित्व करतो. लोकहितवादींनी केलेल्या पूर्वजांच्या निंदेची प्रतिक्रिया म्हणजे चिपळूणकरांनी केलेला पूर्वजांचा गौरव. लोकहितवादींनी स्वतः वर ओढलेल्या कोरड्यांशिवाय समाजाला जागच आली नसती आणि चिपळणकरांनी फिरवलेल्या मोरपिसांशिवाय त्याला प्रेरणाही मिळाली नसती. ‘ (पृ. ४६)
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात जागतिक इंग्रजी, फ्रेंच, जर्मन आदि भाषांमधून आणि संस्कृतातून मोठ्या प्रमाणात मराठी भाषेत अनुवाद करण्याची परंपरा ज्ञानलालसेपोटी व भारतीयांच्या ज्ञाननिष्ठ परंपरेच्या संस्कारांमुळे घडून आलेली दिसते. म्हणूनच ह्या अव्वल इंग्रजी संक्रमणकाळाला ‘बुकीश’ (एकप्रकारे भाषांतरित) साहित्याचा कालखंडही म्हटले गेले. सोबतच समांतरपणे मराठी विचारविश्वात विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि लोकहितवादी गोपाळ देशमुख ह्यांच्या अनुक्रमे ‘निबंधमाले’च्या व ‘शतपत्रां’च्या रूपाने एक सकस वैचारिक निबंधवाङमयाची मुहूर्तमेढ रोवली गेली, जिचा विकास २०व्या शतकापर्यंत, नव्हे आज २१ व्या शतकापर्यंत निरंतर घडून आलेला दिसतो.
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जे वैचारिक प्रबोधनाचे एक मोठे परिवर्तन घडून आले त्याने केवळ मराठीच नव्हे किंवा महाराष्ट्रातच नव्हे तर भारताच्या वैचारिक इतिहासात एक आमुलाग्र परिवर्तन घडून आले. ह्या प्रबोधनाच्या किंवा वैचारिक मंथनाच्या प्रेरक सूत्रांमध्ये जागतिक वाङ्मयातील महत्त्वपूर्ण वैचारिक कृतींचे व विचारांचे एक मध्यवर्ती सूत्र होते हे विसरून चालणार नाही. “इंग्रजी वाघिणीचे दूध प्राशन केलेले मराठी भाषेचे शिवाजी चिपळूणकर” ह्या प्रचलित शब्दावलींतून हे सूत्र आपण लक्षात घेऊ शकतो. बाळशास्त्री जांभेकर, वि. का. राजवाडे, विष्णुबुवा ब्रह्मचारी, कृष्णशास्त्री चिपळुणकर, राजारामशास्त्री भागवत, महात्मा फुले, विठ्ठल रामजी शिंदे, महादेव गोविंद रानडे, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, शिवराम परांजपे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी एक वैचारिक वाङ्मयाची बुलंद आणि समृद्ध परंपरा ह्या काळात मराठीत निर्माण झाली. हाच वारसा पुढेही स्वातंत्र्योत्तर काळात जोमाने पुढे चालविण्यात आला आणि मराठीतील वैचारिक वाङ्मयविश्व समृद्ध होत गेले.
आधुनिक मराठी वाङ्मयाचा पाया रचणाऱ्या निखळ ललित वाङ्मयकारांनीही जो परंपरा आणि नवतेचा सूरम्य मेळ जपलेला दिसतो तसाच मेळ वैचारिक लेखनाच्या व निबंधवाड्मयाच्या प्रवाहातही पहायला मिळतो. देशाचे स्वातंत्र्य आणि समाजसुधारणा या दोन अंगांनी होणाऱ्या चळवळी खरेतर नव्या आधुनिक भारताच्या निर्मितीच्याच चळवळी होत्या आणि या चळवळीचे नेतृत्व करणारे लोकच महाराष्ट्राच्या मराठी भाषेच्या आणि मराठी साहित्याच्या वाट्याला आल्याने ते सारे मराठीच्या अभ्युदयाला कारणीभूत ठरले. समाजाचे नेतृत्व करणारी मराठी माणसे मराठी विचारविश्वाची जडणघडण करीत होती. स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारितेच्या रूपाने हे मराठी विचारविश्व बहरलेले दिसते. ही पत्रकारिता तत्कालीन राष्ट्रीय व सामाजिक चळवळीचे एक मुख्य साधनतंत्र किंवा बायप्रॉडक्ट असल्याने ती सकस, सधन आणि विचारोत्तेजक होती. त्या मंडळींच्या जीवनध्येयांशी ती पत्रकारिता निगडित असल्याने आजच्यासारखे निष्ठांचे आणि नैतिकतेचे प्रश्न तेव्हा गुंतागुंतीचे नव्हते. त्यामुळे त्या ध्येयप्रवण पत्रकारितेत सवंगपणाला, उथळपणाला, धंदेवाईकपणाला व पोकळपणाला आजच्यासारखा फारसा वावच नव्हता.
सर्वसाधारणपणे स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरची ३०-४० वर्षे विशिष्ट अशा राजकीय विचारसरणीच्या प्रभावाची वर्षे होती. राजकीय सत्तेच्या व प्रशासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या मनावर विशिष्ट धारणांविषयी श्रद्धा आणि काही प्रतीकांप्रती घृणा निर्माण करण्याचे प्रयत्न ‘राजा कालस्य कारण’ या उक्तीनुसार झालेले दिसतात. विचारांच्या अभ्यासाच्या क्षेत्रात ज्यास ‘कॅनाल फॉर्मेशन’ म्हणतात, तसे हे प्रेमाचे आणि घृणेचे वैचारिक चाकोरीबद्ध प्रवाह निर्मिले गेले. एका विशिष्ट धर्म-संस्कृतीची फार कठोर चिकित्सा, एकंदरच भारतीय श्रद्धा, प्रतीके आणि मानबिंदूंची सतत कुचेष्टा व मानखंडना आणि दुसरीकडे काही. धर्म-संस्कृतीच्या उघड उघड दिसणाऱ्या दोषांकडे दुर्लक्ष किंवा वेळप्रसंगी त्यांचे समर्थन, असा दऱ्या निर्माण करणारा घातक खेळ ‘विचारवंत’ म्हणविणारे काही विचारांध लोक करीत राहिले. मराठी विचारविश्व आणि साहित्यविश्व अशा एका ‘साचेबद्ध – पुरोगामी विचारभयाखाली वावरत राहिले. श्रद्धा-अंधश्रद्धेच्या उथळ, बाष्फळ आणि अडाणी कल्पना गल्लीबोळातले स्वयंघोषित ‘विचारवंत’ राजसत्तेच्या आश्रयाखाली पसरवत राहिल्यामुळे व ज्ञानाच्या विचारांच्या क्षेत्रात जातीयवादी भूतांनी अनावर धुडगूस घातल्यामुळे मराठी आचारविश्व एकांगी, खुरटे व उथळ बनण्याचा धोका निर्माण झाला. ढोबळ मानाने वैचारिक पर्यावरण आणि राजकीय पर्यावरण हे एकमेकांच्या सोबतीने उभे राहते, घडते. या वैचारिक पर्यावरणाच्या निर्मितीत साहित्यिक, विचारवंत, पत्रकारसंपादक आणि शिक्षकप्राध्यापक हे चार वर्ग महत्त्वपूर्व भूमिका बजावताना दिसतात. समाजाचे विचारविश्व घडविण्याची वा बिघडविण्याची संपूर्ण जबाबदारीच जणू या वर्गाकडे असते.
मराठी समाजाचे आणि संस्कृतीचे भाग्य असे की. राजकीय व वैचारिक पर्यावरण प्रदूषित करण्याच्या प्रयत्नांना मराठी विचारकांच्या थोर परंपरेने निरस्त केले. संस्कृतीचा जनमानसाच्या अंतःस्तरातून वाहणारा प्रवाह जिवंत व अम्लान राहिला. राजकीय बदलांच्या गदारोळातही मराठी संस्कृतीचे मानदंड अक्षय राखण्यात ज्ञाननिष्ठांच्या सच्च्या मांदियाळीला यश लाभले, कारण त्यामागे होते भारतीय धारणा – विचारांचे भक्कम कालोत्तीर्ण अधिष्ठान ! मराठी साहित्यविश्व आणि विचारविश्व ही परस्परांना एका अंगाने छेदणारी दोन मोठी वर्तुळे ठरतात. त्यांच्या आंतर्संबंधातून तयार होणाराही एक मोठा अवकाश असतो. या दोन्ही प्रांतांत एकाच वेळी प्रभाव गाजविणारीही व्यक्तित्वे मराठीत निर्माण झालेली दिसतात. ज्ञानदेव, तुकाराम, रामदास, सावरकर, केतकर, तुकडोजी, साने गुरुजी, नेमाडे अशी काही नावे या दोन वर्तुळातील संयुक्त प्रदेशात समाविष्ट होऊ शकतात.
साठोत्तर काळातील मराठी विचारवंतांमध्ये ढोबळपणे ‘डावे’ आणि ‘उजवे’ असे दोन वर्ग विद्यमान असलेले दिसतात. त्यातही ‘उजव्या’ संस्कृतिनिष्ठ विचारकांना विचारवंत म्हणण्यास काहींना जड जाते. उदाहरणार्थ – महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वाङ्मय इतिहासात ‘वैचारिक वाङ्मय : १९५० ते २०००(खंड ७, भाग ४)’ हा ग. प्र. प्रधान यांनी लिहिलेला लेख दिसतो. वैचारिक वाङ्मयकार म्हणून ज्यांची छायाचित्रे खंडात दिली आहेत ती पाहून या क्षेत्रातील वैचारिक पक्षपातीपणाची साक्ष पटते. भारतीयवादी संस्कृतिनिष्ठ भूमिकेतून लेखन करणाऱ्या व वेळोवेळी समाजाचे प्रबोधन करणाऱ्यांचाही विचारवंत’ या नात्याने विचार व्हायला हवा. हा विचार जात-पंथ-पक्षनिरपेक्ष दृष्टीने होणे आवश्यक आहे. साठोत्तर काळातही विचारकांचे दोन वर्ग कल्पिता येतात- १) पाश्चात्त्यविचार प्रभावित व २) भारतीयवादी. पाश्चात्त्यप्रभावितांचे दोन उपवर्ग- १) मार्क्सवादी व २) वसाहतवादप्रभावित, तर भारतवादींचे दोन उपवर्ग- १) हिंदुत्ववादी व २) गांधीवादी – समाजवादी. विचारविश्वाप्रमाणेच साहित्यविश्वातही असे अंतरंगप्रभाव कार्य करताना दिसतात. कारण साहित्यात निर्मिले जाणारे भावविश्व व विचारविश्व वरील वेगवेगळ्या विचारधारांनी प्रभावित झालेले दिसते. त्यांचेही रूपबंध या विचारांच्या प्रभावांनी ग्रासून घडले – बिघडलेले दिसतात.
भारतीय लेखकाचे मन’, ‘भारतीय साहित्याची संकल्पना’, ‘राष्ट्रीय साहित्याची संकल्पना’ अशा काही कल्पना ‘तौलनिक साहित्याभ्या’ सात चर्चिल्या जातात. त्यावरून ‘भारतीय’ व ‘पाश्चात्त्य’ विचारदृष्टी ललित साहित्यनिर्मितीतही कशी कार्यरत असते, याची कल्पना येते. साहित्यकृतींच्या जडणघडणीमागे एका विशिष्ट विचारदृष्टी ताणेबाणे विणण्याचे काम करते. अवतीभवतीच्या मानवी भावजीवनाकडे बघण्याचा भारतीय लेखकांचा दृष्टिकोन ‘भारतीय संस्कृतिनिष्ठ’ व ‘भारतीय संस्कृतिविरोधी’ असा दोन ध्रुवांत विभागणारा दिसतो. उदा. गिरीश कर्नाड, अनंत मूर्ती, किरण नगरकर आदीमध्ये भारतीयताविरोधी दृष्टिकोन केंद्रस्थानी दिसून येतो, तर दुसरीकडे रवींद्रनाथ, प्रेमचंद, हजारीप्रसाद, निराला, महादेवी, भैरप्पा, नेमाडे आदींच्या कृतींमागे भारतीय विचारदृष्टी मध्यवर्ती दिसते. क्वचित काही साहित्यिकांत दोहोंचा समन्वयही पाहायला मिळतो. मराठी साहित्याचा आणि विचारविश्वाचाही असा विस्तृत अभ्यास करण्यास वाव आहे. खरेतर ‘विचारवंत’ अथवा ‘बुद्धिवंत’ अशी आधी खूपच उथळपणे वापरण्याची पद्धत मराठी माध्यमजगताने रूढ केली आहे. त्यातली डाव्या पुरोगामी विचारांची माध्यमे ठरवून व जाणीवपूर्वक अशा परंपरा रुजवताना दिसतात. त्यामुळे काही नावे खूप मूलभूत विचारप्रबोधनाचे कार्य करूनही अलक्षित राहतात.
स्वातंत्र्योत्तर काळात मराठी विचारविश्वाची जडणघडण करणाऱ्यांत पुढील विविध विचाररंगांच्या नावांचाही निश्चितच मोठा वाटा असल्याचे जाणत्यांच्या लक्षात येईल. असे तुकडोजी महाराज, मा. स. गोळवलकर, ब. स. येरकुंटवार, मा. गो. वैद्य, दत्तोपंत ठेंगडी, राम शेवाळकर, सु. श्री. पांढरीपांडे, लक्ष्मणशास्त्री जोशी, गं.बा.सरदार, नरहर कुरुंदकर, भा.ल.भोळे, रावसाहेब कसबे, डाॅ. सदानंद मोरे, न्या. नरेंद्र चपळगावकर, निर्मलकुमार फडकुले, दि.के.बेडेकर, प्रभाकर पाध्ये, मे.पुं. रेगे, स.ह. देशपांडे, निशिकांत मिरजकर, दुर्गाबाई भागवत, इरावती कर्वे, गो.नी. दांडेकर, रा.चिं. ढेरे, शि.गो.देशपांडे, अरुणा ढेरे, विवेक घळसासी, डा. शं. दा. पेंडसे, डॉ. यशवंत पाठक, बाळशास्त्री हरदास, श्री. मा. कुलकर्णी, गुरुदेव रानडे, मामासाहेब दांडेकर, डॉ. शं. गो. तुळपुळे, शेषराव मोरे, आनंद हर्डीकर, डॉ. अशोक मोडक, भाऊ तोरसेकर, डॉ. अरविंद गोखले, द. न. गोखले, डॉ. सुधीर रसाळ, रमेश पतंगे, प्र. ग. सहस्रबुद्धे, डॉ. शंकर अभ्यंकर, डॉ. सुनील चिंचोळकर, विद्याधर गोखले, डॉ. द. भि. कुलकर्णी, डॉ. भालचंद्र नेमाडे, ह.मो.मराठे, विनय हर्डीकर, अरुण टिकेकर, ल.त्र्यं. जोशी, इत्यादी अनेकांनी मराठी विचारविश्वाचा चेहरामोहरा घडविण्यात मोलाचे योगदान केलेले दिसते. कोणत्याही एकाच पक्षाचा वा विचारांचा एकांगी प्रचार प्रसार करणाऱ्यांपेक्षा समाजधारणेच्या व्यापक दृष्टिकोनातून आपली प्रज्ञा व व्यासंग खर्ची घालणाऱ्या लेखक वक्त्यांना विचारवंत हे बिरुद शोभून दिसते. नव्या शतकात आता या दिशेने वाटचाल होण्याची शुभचिन्हे दिसू लागली आहेत.
*न्या. नरेंद्र चपळगावकर यांचे विचारविश्व*
ललित आणि वैचारिक अथवा ललित आणि ललितेतर अथवा ललित आणि शास्त्रीय अशी साहित्याची दोन प्रकारात विभागणी केली जात असली तरी ह्या दोन बिंदुच्या रेषेवर निर्माण होणारे साहित्यही महत्वाचे ठरते. मराठीत वैचारिक आणि ललित (अनुक्रमे विचारप्रधान आणि भावनाप्रधान) असे दोन्ही प्रकारचे लेखन करणाडे अनेक उत्तम साहित्यिक, उदा० सावरकर, भावे, दुर्गा भागवत, कुसुमावती, द.भि.कुलकर्णी, इरावती कर्वे, गो.नी. दांडेकर, रा.चिं. ढेरे, अरुणा ढेरे असे काही लेखक दिसतात. त्याचप्रमाणे निबंध, लघुनिबंध, प्रवासवर्णन, व्यक्तिचित्रे, चरित्र, ललितलेख आदि वाङ्मयप्रकारांच्या निर्मितीत भावनात्मक घटकांसोबत वैचारिक घटकांचाही मोठा वाटा असतो. मराठीतील अग्रलेखसापेक्ष निबंध- परंपरेतही असा भावना- विचारांचा एकत्र परिपोष पहायला मिळतो. या सर्व पार्श्वभूमीवर वर्धा येथे होणाऱ्या ९६ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली विचारवंत साहित्यिक न्या. नरेंद्र चपळगावकर यांची निवड सार्थ ठरणारी आहे.
नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश असून मराठीत अतिशय गंभीर स्वरूपाचे व महत्त्वपूर्ण असे वैचारिक लेखन करणारे एक संवेदनाशील साहित्यिक आहेत. चपळगावकर ह्यांची आजवर अनंत भालेराव : काळ आणि कर्तृत्व, आठवणीतले दिवस, कर्मयोगी संन्यासी(स्वामी रामानंदतीर्थ यांचे चरित्र), कायदा आणि माणूस, कहाणी हैदराबाद लढ्याची, तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ, तुमच्या माझ्या मनातलं(ललित), त्यांना समजून घेताना(ललित), दीपमाळ (भाषाविषयक, साहित्य आणि समीक्षा), नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज, नामदार गोखल्यांचं शहाणपण, न्यायमूर्ती केशवराव कोरटकर, न्यायाच्या गोष्टी (न्यायविषयक कथा), मनातली माणसं(व्यक्तिचित्रे), महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना, राज्यघटनेचे अर्धशतक, विधिमंडळे आणि न्यायसंस्था : संघर्षाचे सहजीवन, संघर्ष आणि शहाणपण, समाज आणि संस्कृती, संस्थानी माणसं(व्यक्तिचित्रे), सावलीचा शोध(सामाजिक), हरवलेले स्नेहबंध इत्यादी साहित्यसंपदा प्रकाशित झाली आहे. आज चपळगावकर हे प्रामुख्याने वैचारिक स्वरूपाचे लेखन करणारे विचारवंत म्हणून ओळखले जात असले तरी त्यांच्या मराठी साहित्यातील मुशाफरीचा प्रारंभ मात्र कथा आणि कविता या ललित प्रकारातील लेखनाने झाला.
डाॅ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागातातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. तिथे वा.ल.कुलकर्णी आणि त्यांचे अंतरंग मित्र डाॅ. सुधीर रसाळ हे त्यांचे शिक्षक होते. सोबतच त्यांनी एल.एल.बी.ची उपाधीही प्राप्त केली. त्या काळातील सत्यकथेतून प्रकाशित साहित्यावर ह्या साहित्यिक मित्रमंडळींचा पिंड पोसला गेला. वडील काँग्रेसचे मोठे नेते असल्याने वैचारिक अंगाने समाजवाद, गांधीवाद, राष्ट्र सेवा दल आदि विचारांचे संस्कारही नानासाहेबांवर झालेले दिसतात. त्या काळातील वाड्मयीन जडणघडणीचे नेमके वर्णन करताना रसाळसर सांगतात – “कविता, कथा, कादंबऱ्या आणि नाटकं यांचं प्रचंड वाचन करणं, उत्तमोत्तम चित्रपट पाहणं; या सर्वांवर आमच्याशी चर्चा करणं, हे त्याचं प्रारंभीचं वाङ्मयीन जीवन होतं. मी, चंद्रकांत भालेराव आणि नाना; गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर, जी. ए. कुलकर्णी यांच्या कथांवर किंवा एखाद्या चित्रपटावर वाद घालीत झिमझिम पावसात मैलोगणती औरंगाबादच्या बाहेरील परिसरात हिंडत असू. अधूनमधून कुठल्यातरी टपरीवर, पावसात भिजलेले आम्ही चहा पिऊन ऊब मिळवत असू. आम्हा तिघांत चर्चेचा उत्साह नानातच अधिक असे. त्याच्या माघारी आम्ही त्याचा उल्लेख ‘उत्साहमूर्ती’ असा करत असू. नवकथेचा नवकवितेचा तो काळ होता. ‘सत्यकथे’ सारख्या मासिकातून प्रसिद्ध होणाऱ्या कथाकविता ही आमच्या चर्चेची सामग्री होती. तारुण्याच्या प्रारंभकाळातच आम्ही माडगूळकर, विंदा करंदीकर, पाडगावकर, बापट आणि विशेष करून श्री. पु. भागवत यांच्याशी ओळख करून घेतली. पुढे माझा आणि नानाचा या सर्वांशी स्नेहही जडला. वाङ्मयासंबंधीच्या उत्साहाचा तो काळ आम्ही समरसून अनुभवला.”
लेखनाची सुरुवात कथा व कवितांनी करणाऱ्या चपळगावकरांनी त्यानंतर त्यांच्या गंभीर चिंतकाच्या पिंडानुसार आपला मोर्चा वैचारिक, सामाजिक, राजकीय, तात्त्विक लेखनाकडे वळविलेला दिसतो. चपळगावकरांच्या जीवनप्रवासाचा सारांशरूप, नेमका व हृदयंगम आलेख त्यांचे जीवलग मित्र डॉ. सुधीर रसाळ यांनी ‘लोभस’ या व्यक्तिचित्र संग्रहातील “नाना: विधायक वृत्तीचा विधिज्ञ मित्र’ या लेखातून रेखाटले आहे. लोभसची अर्पणपत्रिकाच खरेतर नानांना व त्यांच्या पत्नीला उद्देशून आहे. दुसरीकडे चपळगावकर यांच्या ‘मनातली माणसं’ ह्या व्यक्तिचित्र संग्रहात (हे पुस्तक रा.तु.म. नागपूर विद्यापीठाच्या एम.ए. मराठीच्या अभ्यासक्रमात नेमले आहे.) ‘बापू’ या नावाने रसाळांचे व्यक्तिचित्रण केलेले दिसते. परस्परांच्या या दोन्ही व्यक्तिचित्रांतून एक निरामय, गाढ, प्रगाढ मैत्रभाव, वैचारिक सहोदरता आणि शैलीचे गांभीर्य प्रत्ययाला येते.
चपळगावकरांच्या वैचारिक लेखनातून ते महाराष्ट्राचा एकोणिसाव्या शतकातील उदारमतवादी आधुनिक विचारकांचा इतिहास शोधताना आणि मांडताना दिसतात. या संपूर्ण मांडणीतील त्यांचा दृष्टिकोन मात्र समन्वयशील आणि उदार असल्याचा प्रत्यय येतो. एकांगी आणि जातीयवादी विचारकांच्या पार्श्वभूमीवर तो वेगळा उठून दिसतो. हेच सूत्र नेमकेपणाने वर्णिताना रसाळसर म्हणतात – “आजचा नाना हा नेमस्त, उदारमतवादी प्रवृत्तीचा आहे. म्हणूनच त्यानं एकोणिसाव्या शतकातील नागरी समाज घडवणाऱ्या चळवळींच्या शोधात रस घ्यायला प्रारंभ केला. त्यामुळेच महादेव गोविंद रानडे, तेलंग, चंदावरकर, गोपाळ कृष्ण गोखले हे त्याच्या अभ्यासाचे मुख्य विषय झालेले आहेत. त्याचं ‘तीन न्यायमूर्ती’ हे पुस्तक याची साक्ष देतं. आता त्याचं गोपाळ कृष्ण गोखल्यांवरचं पुस्तक प्रसिद्ध होत आहे. तो टिळकांवर जरी लिहीत असला, तरी टिळकांच्या व्यक्तिमत्त्वातल्या स्फोटक भागाऐवजी तो त्यांच्यातल्या विधायक प्रवृत्तीविषयी लिहिताना दिसतो. कुठल्याही सामाजिक-राजकीय घटनेतली चांगली, समाजपोषक, विधायक बाजू पाहण्याची त्याची प्रवृत्ती आहे. अशा घटनांतील संहारक, अनैतिक घटकांचा तो निर्देश करील; पण त्याचा भर विधायक घटकांच्या विस्तारपूर्वक मीमांसेवर असेल.”
डाॅ. राजेंद्र नाईकवाडे
नागपूर