‘रंग त्या नभाचे’ कथासंग्रहाचे प्रकाशन उत्साहात

0

नागपूर(Nagpur), 8 जून :- विदर्भ साहित्य संघ आणि दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. नितीन करमरकर(Dr. Nitin Karmarkar) लिखित ‘रंग त्या नभाचे’ या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवारी उत्साहात पार पडला.

विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वि.सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते होते. तसेच, कार्यक्रमात 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे(Dr. Rabindra Sobhane), वनराई फाऊंडेशनचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी, ज्येष्ठ साहित्यिक वि. स. जोग, डॉ. अजय कुळकर्णी, डॉ. नितीन करमरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते ‘रंग त्या नभाचे’ या कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

पुस्तकावर भाष्य करताना डॉ. अजय कुळकर्णी(Dr. Ajay Kulkarni)म्हणाले, या कथासंग्रहातील पाचही कथा उत्तम आहेत. पहिली कथा ‘रंग त्या नभाचे’ आजच्या पिढीची मानसिकता वर्णन करणारी आहे. विषय मांडताना तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे ही तळमळ त्यातून दिसते. नमस्कार ही कथा वृद्धाश्रमाच्या ज्वलंत विषयावर आहे. कथेची मांडणी करण्यात आणि चांगला संदेश देण्यात लेखक यशस्वी झाले. संपूर्ण कथासंग्रहातून सकारात्मक, आशावादी कथाकार जाणवत असल्याचे मत त्यांनी मांडले.

डॉ. शोभणे म्हणाले, अलीकडे विदर्भात काही चांगले लेखक येऊ घातले आहेत. त्यापैकी नितीन करमरकर आहेत. करमरकरांची कथा दीर्घ कथा आहे. मराठी कथेला चांगले दिवस आले आहेत. कथांमधून मानवी मनाचे सूक्ष्म अवलोकन केले गेले आहे, असे ते म्हणाले.

डॉ गिरीश गांधी म्हणाले,
करमरकरांच्या कथांचे विषय सामाजिक संदर्भांना स्पर्श करणारे आहेत. सर्व कथांचा शेवट गोड आहे. सकारात्मक लेखन करणार्‍यांची समाजाला आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. वि. स. जोग म्हणाले, करमरकरांचा हा कथासंग्रह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणार यात शंका नाही. कथा त्यातील लिखाणाच्या शैलीने लोकांच्या लक्षात राहते. ती शैली यातून दिसते, असे ते म्हणाले.

डॉ. नितीन करमरकर म्हणाले, समर्पण हा माझा पहिला, तर रंग त्या नभाचे हा दुसरा कथासंग्रह. साहित्यनिर्मिती करताना जबाबदारीची जाणीव ठेवावी लागते. कथालेखन करताना कोणत्या गोष्टीचे भान ठेवावे याचे मार्गदर्शन शोभणेंकडून मिळाले,

अध्यक्षीय समारोप करताना प्रदीप दाते यांनी, समाजातील अनेक प्रश्न करमरकरांनी आपल्या विविध कथांमधून चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. असंच चांगलं लेखन पुढेही ते करतील, अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमात उत्कृष्ट निवेदन, तसेच आभारप्रदर्शन वृषाली देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाला वि. सा. संघाचे सरचिटणीस विलास मानेकर, डॉ. राजेंद्र डोळके, निलेश खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.