

अमरावती(Amravati)
खिसमस अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने खिस्ती बांधवांनी रविवारी वीकेण्डची संधी साधून खरेदी करण्यासाठी शहरातील बाजारपेठांसह मॉलमध्ये गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. विविध आकाराचे ख्रिसमस ट्री, सिरेमिक बाहुल्या, चांदण्या, झालर, स्नोमॅन, सोनेरी रंगांच्या घंटवाची माळ, एनल्स, चांदण्यांचे कंदिल, शुभेच्छा कार्ड, सांताक्लॉजची टोपी हेअरबँड, कपडे, ड्रम, मोजे आदी सजावटीचे साहित्य, तसेच चॉकलेट्स, केक आणि कपड्यांची त्यांनी मनसोक्त खरेदी केली. शहरातील दुकाने खिसमसनिमित्त सजली आहेत. येशू ख्रिस्तांच्या जन्माचा देखावा तयार करण्यासाठी अनेकांची लगबग सुरू आहे. बाजारात येशू खिस्तांच्या जन्माचे रेडिमेड देखावेही मिळत असल्याने अनेक ग्राहक ते खरेदी करण्याला प्राधान्य देत असल्याचे बाजारपेठेतील एका विक्रेत्याने सांगितले. अगदी २०० ते दोन हजार रुपयांपर्यंतचे देखावे बाजारात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ५० रुपयांपासून ते हजारो रुपयांपर्यंत सजावटीचे साहित्य मिळत आहे. नागरिकही मोठ्या आनंदाने साहित्य खरेदी करत आहेत.
सांताक्लॉजचे मुखवटे, टोप्या अन् कापडी हेअर बॅण्ड
ख्रिसमसनिमित्त सांताक्लॉजचे मुखवटे, टोप्या अन् कापडी हेजर बॅण्ड ४० ते ६० रुपयांपर्यंत मिळत आहेत. ख्रिसमस ट्री ७० रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. जपानी चेन ३० ते ६० रुपये, शोभीवंत माळा ३० ते १०० रुपये, मोठ्या आकारातील बेल १२० ते ४०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. खिस्ती बांधवांच्या घरी रविवारी केक, विविध पद्धतींचा पारंपरिक फराळ तयार करण्याची लगबग सुरु होती. फराळासाठी लागणारे विविध जिन्नस, साहित्य खरेदीकडे महिलांचा कल दिसून आला. ख्रिसमस स्पेशल मेणबत्त्या आणि डिझायनर बेल्सला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच, अनेकानी आठवडाभरापासूनच सांताच्या पायातील बुटाचा संच असलेली तोरणे, गिफ्ट्सचे बॉक्स गुंफून तोरणे तयार केली आहेत.