भंडारा- भंडारा शहरातील शास्त्री चौक ते सिंधी कॉलनी ते नागपूर या बायपास रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. अपघात होऊन अनेकांचा जीव जात आहे. या मार्गावर तीन शाळा असून सर्व नागरिकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात या मार्गावर रहदारी असते. मात्र या मार्गाने मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दिवस रात्र वाहतूक होत असल्याने हा मार्ग पुर्णपणे उखडला आहे. या मार्गावर दोन ते तीन फूट खोल असे खड्डे पडल्याने नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर काही नागरिकांचा या खड्ड्याने जीवसुद्धा घेतला आहे.
या मार्गाचे नव्याने बांधकाम करण्यात यावे व या मार्गाने अवजड वाहनांच्या वाहतुकीवर प्रतिबंध घालण्यात यावे याकरिता आज या परिसरातील नागरिकांनी झुलेलाल चौक येथे रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.













