
Independence Day अमरावती (Amravati) : 14 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगी झेंडे आणि देशभक्तिपर विविध वस्तू बाजारात विक्रीस आल्या असून, आहेत. शहरातील ठिकठिकाणी या वस्तूंची दुकाने लागल्याचे दिसून येत आहे. अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या १५ ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनानिमित्त चिमुकल्यांसह नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. वाहन, घरांवर लावण्यासाठी तिरंगी झेंडे यासह देशभक्तीपर संदेश देणारे बॅच, स्टिकर, टॅटू, ब्रेसलेट, अंगठी, तिरंगी, फुगे आशा विविध वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. राजकमल चौक, गांधी चौक, मोची गल्ली, जयस्तंभ, श्याम चौक, गाडगे महाराज समाधी मंदिर परिसरासह विविध ठिकाणी अशा वस्तू खरेदी विक्रीचे दुकाने लागले आहेत. दुकानांवर विक्रीस असलेले तिरंगी झेंडे वाऱ्याने फडकत आहेत.
नागरिकांनी वस्तू खरेदीसाठी मंगळवारी बाजारपेठेत गर्दी केली होती. महागाईमुळे सर्वच वस्तूंच्या किमतीमध्ये सुमारे २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. तिरंगा झेंड्यांना अधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. स्वातंत्र्य दिनासाठी विविध संस्था, शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये प्रामुख्याने राष्ट्रध्वजाची खरेदी करत असतात.
त्यासाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे. विशेषत: राष्ट्र ध्वज खरेदीला पसंती दिली जात आहे. मागणीनुसार विविध आकारांमध्ये हे ध्वज उपलब्ध आहेत. यंदाच्या बाजारपेठेतील प्रमुख आकर्षण म्हणजे पोशाखावर लावले जाणारे छोटे झेंडे, लहान आकारातील कागदी, कापडी व मेटलचे झेंडे उपलब्ध झाले आहेत.
त्यालाच ग्राहकांची मोठी पसंती आहे. विविध आकारातील झेंड्यांना मोठी मागणी आहे, तर दरवर्षी पोशाखावर लावणाऱ्या कापडी व मेटलच्या झेंड्यांना पसंती मिळत आहे. पथकांची संचलनाची तयारी जोरात स्वातंत्र्य दिनासाठी शाळेची स्वच्छता, वर्गांची सजावट, विविध साहित्यांची दुरुस्ती, विविध पथकांची संचलनाची तयारी अशा प्रकारे संपूर्ण परिसरात प्रसन्न वातावरण असते. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकही तेवढ्याच उत्साहाने या सर्वांमध्ये समाविष्ट होत असतात.
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी विविध शाळांमधून काढल्या जाणाऱ्या प्रभात फेरीचे सर्वांनाच विशेष आकर्षण असते. पारंपरिक वेशभूषेत लेझीम, ढोल ताशांसह विद्यार्थी यामध्ये सहभागी होत असतात.
















