

तथागतच्या आरोग्यासाठी दिली दहा हजारांची आर्थिक मदत
चंद्रपूर (Chandrapur): नाते आपुलकीचे बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर या संस्थेतर्फे तथागत प्रदीप गोवर्धन या युवकाच्या उपचारासाठी १० हजारांची आर्थिक मदत दि. १८ जुलै २०२४ ला देण्यात आली.
मुल तालुक्यातील (Mul)जूनासूर्ला या छोट्याश्या खेडे गावात वास्तव्यास असलेल्या प्रदीप गोवर्धन यांचा मुलगा तथागत हा किडनीच्या आजाराने मागील चार महिन्यांपासून ग्रासलेला होता. वडिलांनी उपचारासाठी पैशाची तडजोड करून त्याचा उपचार सुरू ठेवला परंतु तथागतच्या प्रकृतीत त्या उपचाराने प्रकृतीत जरा सुद्धा सुधारणा झाली नाही आणि दिवसेंदिवस त्याची प्रकृती आणखीनच खराब होत गेली. मुलाच्या आरोग्याला धोका होऊ नये म्हणून वडिलांनी शक्य होईल त्या पद्धतीने त्याचा उपचार केला. पण शेवटी परिस्थिती समोर हतबल होऊन त्यांना दवाखान्याचा खर्च वाढल्याने तथागतचा उपचार एका आयुर्वेदिक दवाखण्यात सुरू केला. ही बाब अनुराग गोवर्धन ज्याला याआधी संस्थेने अशाच प्रकारची मदत केली होती या युवकाने नाते आपुलकी या संस्थेला कळवली,तेव्हा संस्थेचे सचिव प्रमोद उरकुडे सर यांनी तत्काळ माहितीची दखल घेत. संस्थेच्या सदस्यांना सांगितली व तथागतला आर्थिक मदत करण्याचे ठरले.
तथागत हा युवक बालपणापासूनच हुशार असल्याने त्याला उच्च शिक्षण द्यायचे आई वडिलांनी ठरवले होते. सद्या तो बी. एस. सी. नर्सिंग चे शिक्षण घेत होता, अशातच त्याला किडनी चा आजार झाल्याने त्याचे समोरील शिक्षण धोक्यात आले. नाते आपुलकीचे ही संस्था मागील अनेक वर्षापासून शिक्षण व आरोग्य या गोष्टीसाठी आर्थिक मदत करत आलेली आहे. तथागतचे प्रकृती बरी होऊन त्याला समोरील शिक्षण घेता यावे या साठी नाते आपुलकीचे या संस्थेने त्याला १०,००० /- आर्थिक मदत केली. या वेळेस संस्थेचे सचिव प्रा.प्रमोद उरकुडे,सदस्य घनश्याम येरगुडे,प्रा.राजेश बारसागडे,अजय दुर्गे,नंदिनी मेश्राम आणि मुलाच्या वडिलांची उपस्थिती होती.