

अमरावती (Amravati), 18 ऑगस्ट, अचलपूर विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा अपक्ष म्हणून निवडून येणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख व आमदार बच्चू कडू (Prahar Jan Shakti Party chief and MLA Bachu Kadu)यांनी राज्यातही स्वतःची एक वेगळी अशी ओळख करत जनतेतून लक्षणीय समर्थन मिळवल्याने विविध राजकीय पक्षांची प्रमुख नेतेमंडळी आ. कडू यांच्या संपर्कात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आ. कडू यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेत त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. या भेटींमागे काही राजकीय गणिते आहेत का याच्याच चर्चा सध्या राज्यात रंगताना दिसत आहेत.
मागील वर्षी डिसेंबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार हे दोन दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर असताना त्यांनी आ. बच्चू कडू यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. मागील काही दिवसांपूर्वी देखील शरद पवार आणि आ. कडू यांची भेट झाली होती. त्यामुळे ही भेट नव्या राजकीय गणितांची नांदी आहे का असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, पवारांसोबतची आपली भेट ही राजकीय व सामाजिक विषयांसोबतच प्रामुख्याने शेतीसंबंधी अनेक विषयांवर झाल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. शेती मधील पेरणी ते कापणी पर्यंतची सर्व कामे ही रोजगार हमी योजनेतून झाली तर उत्पादन खर्चात बचत होईल या दृष्टीने आ. कडू हे सातत्याने प्रयत्न करत असल्याचेही विधिमंडळ अधिवेशनादरम्यान दिसून आले आहे.
दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील (Senior BJP leader Chandrakant Patil) यांनी देखील आ. कडू यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. आ. कडू हे महायुतीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून रंगत आहेत. लोकसभा निवडणुकीत सांगता सभेसाठी अमित शहांच्या सभेसाठी ऐनवेळी मैदानाची परवानगी रद्द केल्यामुळे आ. कडू यांनी भाजपवर सडकून टीका केली होती.
काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे आक्रोश मोर्चा काढून त्यांनी सरकारकडे अनेक मागण्या केल्या होत्या. त्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आपण आगामी विधानसभा तिसरी आघाडी करून निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचा इशारा आ. कडू यांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांची समजूत काढण्यासाठी भाजपने कंबर कसल्याचे दिसून येत आहे. चंद्रकांत पाटील हे आ. कडू यांची नाराजी दूर करण्यासाठीच त्यांच्या निवासस्थानी गेल्याचे बोलले जात आहे. मात्र, या भेटीनंतर आ. कडू यांनी ‘शरद पवार चहा प्यायला आले होते, चंद्रकांत पाटील हे जेवण करायला आलेत’ असे मिश्किल उत्तर देऊन या भेटींमागचे गूढ कायम ठेवले आहे.