

अहमदनगर (Ahmednagar): हनुमान जयंतीनिमित्त शिर्डी येथे आगळ्या-वेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. साईमंदिराच्या लगत असलेल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरासमोरील 125 किलो वजनाचा बजरंग गोटा उचलण्याची ही स्पर्धा असते. शक्ती बरोबर युक्तीचा मेळ घालून हा भरीव वजनदार दगड उचलला जातो. आज हनुमान जयंती निमित्त पन्नासपेक्षा आधिक युवकांनी हा बजरंग गोटा उचलण्याचा प्रयत्न केला. यातील वीस युवकांना यशस्वीपणे हा बजरंग गोटा उचलता आला. हा बजरंग गोटा मोठ्या ताकदीने उचलून खांद्यावरुन मागे टाकावा लागतो, यात मोठी कसरत लागते त्याच बरोबर युक्तीचा देखील उपयोग करावा लागतो. शिर्डीतील हनुमान मंदिराला लाभलेली ही एक मोठी परंपरा आहे. जे स्पर्धक हा गोटा उचलण्यात यशस्वी होतात त्यांचा सत्कार करण्यात येतो अशी माहिती क्रांती युवक संघटनेचे संस्थापक सचिन तांबे यांनी दिली.