हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरला

0

नागपूर -राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस अपेक्षेप्रमाणे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वादळी ठरला. अवकाळी पाऊस झालेले नुकसान शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या या मागण्यासाठी गळ्यात संत्र्याच्या माळा घालून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. सरकारचे लक्ष वेधले. लागलीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नागपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधायला पोहचले. दुसरीकडे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना दिशा सलियान प्रकरणी घेरण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला. या संदर्भात एसआयटी चौकशीचे संकेत असल्याने ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री नवाब मलिक आज विधानसभेत आले. कारागृहातून बाहेर आल्यानंतर ते नेमके कोणत्या गटात जाणार याविषयीची अनिश्चितता होती. आज सत्तारूढ बाकावर बसून त्यांनी आपण अजितदादांच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले. विरोधी पक्ष नेत्यांनी आक्षेप घेतल्यानंतर राजकीय वातावरण तापले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना पत्र लिहून महायुतीत मलिक यांच्या प्रवेशाला नाराजी व्यक्त केल्याने आजचा दिवस वादळी ठरला.