

जाहनू बरुआ यांचे प्रतिपादन
नागपूर एडशिन : 23 वा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा थाटात शुभारंभ
नागपूर (nagpur), 28 फेब्रुवारी
आजवर आम्ही अनेक वर्षे चित्रपटसृष्टीत काम केले पण आता आमचा काळ संपला, नवी पिढी या क्षेत्रात येणे आवश्यक आहे. या क्षेत्रात आधुनिक तंत्राचा वापर वाढला असून नव्या पिढीला हे क्षेत्र खुणावते आहे, असे प्रतिपादन बारा राष्ट्रीय पुरस्कार विजेते, पद्मभूषण जाहनू बरुआ यांनी येथे केले.
महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, सांस्कृतिक कार्य विभाग, पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मेराकी परफॉर्मिंग आर्टस ऑर्गनायझेनशच्या सहकार्याने आयोजित नागपूर एडीशन : 23 वा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे आज, शुक्रवारी सायंकाळी व्हीआर मॉल, सिनेपोलिसमध्ये उद्घाटन करताना ते बोलत होते. याप्रसंगी प्रख्यात दिग्दर्शक व पिफ चे संचालक डॉ. जब्बार पटेल आणि संयोजक अजेय गंपावार यांची उपस्थिती होती. तसेच पिफचे क्रिएटिव्ह हेड व फिल्मगुरु समर नखाते, डेप्युटी डायरेक्टर अदिती अक्कलकोटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना जाहनू बरुआ यांनी, चित्रपटसृष्टीत करीअरच्या भरपूर संधी आहेत, क्षेत्रातील त्या संधीचा लाभ घेण्यासाठी युवा पिढीने प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान अर्जित करावे यासाठी त्यांना विशिष्ट घटकावर लक्ष केंद्रीत करुन काम करावे लागेल. त्यातून त्यांना या क्षेत्रातील संधींचा लाभ घेणे शक्य होईल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी बोलताना ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी आपल्या छोटेखानी भाषणात सामान्य माणसांच्या समस्या मांडण्याचे कसब जागतिक चित्रपटसृष्टीत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत बाहुबली, पुष्पा यासारखे अॅक्शन चित्रपट तंत्रज्ञानावर आधारित स्वरुपात पुढे आले आणि अल्पाधतीच लोकप्रिय झाले. सध्या भारतीय चित्रपट सृष्टीतील राजकपूर, मोहम्मद रफी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने होत असलेला हा चित्रपट महोत्सव युवा पिढीला एक व्यासपीठ निर्माण करुन देत आहे. या महनीयांवर तयार करण्यात आलेले टेलिफिल्म रसिकांनी आवर्जुन पहावे. तसेच चित्रपट महोत्सवात दाखविण्यात येणारे पंधरा चित्रपट नव्या पिढीसाठी दिशादर्शक ठरतील, असा आत्मविश्वासपूर्ण सल्ला त्यांनी दिला.
महोत्सवाचा प्रारंभ हर्षल थॉमस यांच्या अॅकॉर्डियन वादनाने झाला. त्यानंतर फेस्टिव्हलच्या कॅटलॉगचे लोकार्पण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. जाहनू बरुआ व जब्बार पटेल यांचा सत्कार अजेय गंपावार यांनी केला. या कार्यक्रमात समर नखाते, सिनेपोलिसचे अमित कोरी, मंच संचालक आसावरी देशपांडे आदींचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अजेय गंपावार यांनी केले. तर उपस्थितांचे आभार मेराकीचे प्रमुख रुपेश पवार यांनी मानले. उद्घाटनानंतर पोलंड येथील डॅमियन कोकर दिग्दर्शित ‘अंडर द वॉल्कनो’ हा सिनेमा दाखविण्यात आला.