शिवसेनेच्या दोन गटातच रंगणार लढत

0

लोकसभा निवडणूक यवतमाळ-वाशिम मतदारसंघ

नागपूर(Nagpur): (शंखनाद चमू) यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच एकाच पक्षाच्या दोन गटाच्या उमेदवारांत यावेळी रंगतदार लढत होणार आहे. महायुतीतर्फे राजश्री हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी मंत्री संजय देशमुख यांना फार पूर्वीच पक्षाने उमेदवारी दिल्याने त्यांनी प्रचारात आघाडी घेतली. विद्यमान खासदार भावना गवळी आणि तिकीट इच्छुक मंत्री संजय राठोड यांना डावलून नवा चेहरा म्हणून शिंदे सेनेकडून यवतमाळ माहेरघर असलेल्या राजश्री हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नामांकन दाखल झाले. वाऱ्यावर सोडणार नाही असा शब्द देऊनही भावना गवळी गैरहजर राहिल्या.

यावरुन आता शिवसेनेच्याच दोन गटातील उमेदवार आमने-सामने उभे ठाकले आहेत. पूर्वइतिहास लक्षात घेता सलग तीन वेळा शिवसेनेकडून भावनाताई पुंडलिकराव गवळी या विजयी झाल्या. त्यामुळे यावेळीही त्यांनी उमेदवारीवर दावा केला. मात्र भाजपाने त्यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने शिंदे सेनेमध्ये मोठा पेच निर्माण झाला.अर्ज दाखल करण्याच्या पूर्वसंध्येला हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचे तिकीट कापून राजश्री हेमंत पाटील यांना यवतमाळला उमेदवारी घोषित झाली. आता ठाकरे शिवसेनेचे माजी मंत्री संजय देशमुख आणि शिंदे सेनेच्या राजश्री हेमंत पाटील या दोघांमध्ये सरळ लढत आहे. वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिला असला तरी त्यांचा अर्ज पडताळणीत बाद झाला ही मविआला दिलासा देणारी बाब असून महायुतीसाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष देऊन आहेत.
२०१४ मध्ये शिवसेनेकडून भावना गवळी आणि कॉंग्रेसकडून अ‍ॅड.

शिवाजीराव मोघे यांच्यात लढत झाली. भावना गवळी यांना ४ लाख ७६ हजार ९३० मते मिळाली तर अ‍ॅड. मोघे यांना ३ लाख ८३ हजार ६३९ मते मिळाली. भावना गवळी ९३ हजार ९९१ मतांची आघाडी घेत विजयी झाल्या होत्या. २०१९ मध्ये शिवसेनेने पुन्हा भावनाताई गवळी यांनाच उमेदवारी दिली. यावेळी कॉंग्रेसने कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत भावना गवळी यांनी ५ लाख ४० हजार १०४ मते घेतली तर माणिकराव ठाकरे यांनी ४ लाख २२ हजार ४९७ मते घेतली. गवळी यांनी कॉंग्रेसच्या ठाकरेंचा १ लाख १७ हजार ६०७ मताधिक्क्याने पराभव करीत विजय मिळविला. या दोन्ही निवडणुकांत महाराष्ट्रात शिवसेनेची भाजपासोबत युती होती हे विशेष.
सध्याच्या २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठा बदल झाला आहे. एकाच पक्षाच्या दोन गटाच्या उमेदवारांमध्ये अटीतटीचा सामना पहायला मिळणार आहे.