

– स्व. राम शेवाळकर यांचे स्मारक उभारणार
– अभिवादन शेवाळकर महोत्सवाचा समारोप
– श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचा उपक्रम
नागपूर (Nagpur),3 मे
वक्तादशसहस्त्रेशू स्व. राम शेवाळकर यांच्या स्मरणार्थ श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट तर्फे स्थानिक व्हॉलिबॉल मैदान लक्ष्मीनगर येथे त्रिदिवसीय अभिवादन शेवाळकर महोत्सवाचा शनिवारी
प्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे यांच्या सुमधुर गायनाने समारोप झाला.
त्यांची सुरावट आणि गीतांची निवड यामुळे चोखंदळ रसिक स्वरगंगेत अक्षरश: न्हाऊन निघाले. विशेष म्हणजे रसिकांनी त्यांच्या गायकीचे उर्त्स्फूतपणे दाद देत कौतुक केले.
संगीत मैफलीपूर्वी मुख्य आयोजक आ. संदीप जोशी, आ. कृष्णा खोपडे, डॉ. स्वानंद पुंड, रोकडे ज्वेलर्सचे राजेश रोकडे, हॉटेल सयाजीचे संचालक अनिल नायर, हॉटेल अशोकाचे संचालक संजय गुप्ता, प्रफुल्ल माटेगावकर यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यक्रम आवर्जून हजेरी लावली.
यावेळी डॉ. स्वानंद पुंड यांनी, नानासाहेब शेवाळकर राज्याचे भूषण होते. त्यांना प्रसिद्धी नव्हे तर कीर्ती लाभली होती, हीच त्यांची खरी ओळख असल्याचे सांगितले.
पुढील वर्षीचा अभिवादन शेवाळकर महोत्सव याच कालावधीत होणार असून त्यात प्रसिद्ध कीर्तनकार आणि गायक यांची त्रिदिवसीय मैफल आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आ. संदीप जोशी यांनी दिली.
प्रियांकाच्या मैफलीचा शुभारंभ तुज मागतो या गणेश वंदनेने केले.त्यानंतर नाही मी बोलत हे नाट्यपद, स्व. सुरेश भट यांचे केव्हा तरी पहाटे हे गीत, मी मज हरखून बसले गं, ए..श्याम, हमरी अटरीया पे, कुणी पाय नका वाजवू, त्या तिथे पलिकडे, अशी निरनिराळ्या प्रकारातील गीतांनी रसिकांना खिळवून ठेवले. आजच्या मैफलीत प्रियांका यांनी निराळ्या धाटणीची गीते विलंबित पद्धतीने गात रसिकांची दाद मिळविली.
स्व. राम शेवाळकर यांचे स्मारक उभारणार
व्हिएनआयटी जवळ स्व. राम शेवाळकर यांचे स्मारक उभारेल जाणार असून अंबाझरी येथे ई-लायब्ररी व वक्तृत्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
राम शेवाळकर यांच्या सांस्कृतिक योगदानाची दखल घेत उभारण्यात येणारे ई-लायब्ररी तसेच वक्तृत्व प्रशिक्षण केंद्र हे त्यांचे खरे स्मारक ठरेल. यातून वक्त्यांची नवी पिढी घडण्यास मदत होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.