

– प्रा. विवेक कवठेकर यांचे प्रतिपादन
– रामस्मरण व्याख्यानमालेचा समारोप
नागपूर (Nagpur)
रामनामात परमेश्वरी तत्व आहे, त्यात पावित्र्य असल्यामुळे ते रामतत्व आहे, पण रामाचे चरित्र युगानुयुगे प्रेरणादायी असल्याने ते नित्यनूतन असल्याचे प्रतिपादन संस्कार भारतीचे विदर्भ प्रांत महामंत्री प्रा. विवेक कवठेकर यांनी केले.
डॉ. हेडगेवार स्मारक समितीतर्फे कलासंगम, कला व सांस्कृतिक मंडळ आणि केशवनगर सांस्कृतिक सभा यांच्या सहकार्याने स्व. सुनील देवउपाध्ये यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्रिदिवसीय रामस्मरण व्याख्यानमालेचे आयोजन महर्षी व्यास सभागृह, डॉ. हेडगेवार स्मारक परिसर, रेशीमबाग येथे करण्यात आले. व्याख्यानमालेचे समारोपीय सत्र गुरुवारी पार पडले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी, व्याख्याते संस्कार भारतीचे विदर्भ प्रदेश महामंत्री प्रा. विवेक कवठेकर, केशवनगर सांस्कृतिक सभेचे अध्यक्ष किशोर धाराशिवकर, उपाध्यक्ष प्रकाश देशपांडे, डॉ. हेडगेवार स्मारक समितीचे विकास तेलंग, सत्कारमूर्ती डॉ. वसंत खळतकर, कलासंगमचे अध्यक्ष अमर आकरे, सारिका चिंचमलातपुरे, उपस्थित होते.
नित्यनूतन राम या विषयावर बोलताना प्रा. विवेक कवठेकर यांनी, रामाचा संपूर्ण वंश अतिशय मोठा होता, पण अनेक राजांपैकी फक्त राजा रामाचेच नाव अनेक युगानंतर देखील आदर्श व नित्यनूतन आहे. यात भारतातच नव्हे तर जगातील अनेक भाषांमध्ये रामायणांची निर्मिती झाली. सत्यवाचक, मर्यादापुरुषोत्तम, गुणवान, सामर्थ्यशाली आदी गुणवर्णन त्यांचे सातत्याने होत असते. रामनामातून जीवनात विलक्षण अनुभव येतात, हे सामर्थ्य रामनामात असल्याने ते नित्यनूतन असल्याचेही सांगितले.
दीपप्रज्वलन आणि रामप्रतिमा पूजनानंतर मूकबधिर शाळेच्या मुलींनी श्रीरामाच्या विविध गीतांवर नृत्यनाटिका सादर केली. राष्ट्रीय बालरोग तज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल या कार्यक्रमात डॉ. वसंत खळतकर यांचा कांचन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. वसंत खळतकर यांनी प्रामाणिकपणा आणि सामाजिक कार्यात सहभागी होण्याची प्रेरणा संघ कार्यालय व रेशीमबागवासीयांमुळेच मिळाली असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात संजिवन प्राणायाम वर्गाचे अनिल मानापुरे, लोकतंत्र मिररचे मोहन जाधव, गार्डन फ्रेन्डसचे यादव तसेच देवउपाध्ये कुटुंबातील सुरुची देवउपाध्ये यांचा सत्कार करण्यात आला. संचालन व आभारप्रदर्शन प्रकाश एदलाबादकर यांनी केले.
रामस्मरण व्याख्यानमालेच्या यशस्वीतेकरीता केशवनगर सांस्कृतिक सभा व कलासंगमचे पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.
रामतत्व अंगिकारा : कांचन गडकरी
रामप्रहरी रामनाम घेण्याची पद्धत आहे, त्यातून सकारात्मकता मिळते. त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने असे रामतत्व अंगिकारावे असे आवाहन कांचन गडकरी यांनी अध्यक्षीय भाषणातून केले.