सख्या भावाला जिवंत जाळलं नेमकं प्रकरण काय ?

0

 

नाशिक (Nashik), 10 जुलै निफाड तालुक्यात वडिलोपार्जित विहिरीच्या वादातून छोट्या भावाने मोठ्या भावाला जिवंत जाळण्याची घटना घडली आहे. यामध्ये उपचार सुरू असताना मोठा भाऊ मृत पावला आहे.

याप्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कचेश्वर महादू नागरे असे गंभीर भाजलेल्या वृध्दाचे नाव आहे. थर्डी सारोळे येथील नागरे बंधूमध्ये वडीलोपार्जीत विहीरीवरून वाद आहे. वयोवृध्द कचेश्वर नागरे हे मंगळवारी (दि.९) आपल्या शेतातील घराजवळ साफसफाई करीत असताना ही घटना घडली. कचेश्वर नागरे यांचे कुटूंबिय घरात असल्याची संधी साधत अचानक हातात डिझेलचे डबके घेऊन आलेल्या त्यांच्या धाकल्या भावासह भावजई व दोन पुतण्यांनी कचेश्वर यांच्या अंगावर डिझेल टाकून पेटवून दिले.

काही समजण्याच्या आत घडलेल्या या घटनेनंतर कचेश्वर यांनी सैरभैर पळत आग विझविण्याचा प्रयत्न केला. वडिलांचा ओरडण्याचा आवाज आल्याने कुटुंबियाने घराबाहेर धाव घेतली मात्र तत्पूर्वीच संशयित नागरे कुटुंबिय पसार झाले होते. या घटनेत कचेश्वर नागरे गंभीर भाजल्याने मुलगा हनुमंत नागरे यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले. पण, त्यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला.