– चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती
•
नागपूर- धनगर समाजाची विविध आंदोलने सुरू असून,त्यांच्या समस्या घेऊन प्रदेश चिटणीस नवनाथ पडळकर व राम वडकुते माझ्याकडे आले होते. धनगर समाजाच्या मागण्या व समस्या सरकारकडे पाठविल्या. तेवढाच त्या पत्राचा अर्थ असून त्यापेक्षा अधिक नाही, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज व्यक्त केले. कुणीतरी या पत्राचा वापर करून वातावरण खराब करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
बावनकुळे यांनी दिलेल्या पत्राला सोशल मीडियावर प्रसारित करून त्याचा अपप्रचार सुरू असल्याचा प्रकार चुकीचा आहे, असे मत व्यक्त करून ते म्हणाले की, महिला आरक्षण विधेयकामुळे कॉंग्रेस पक्ष बॅकफूटवर गेला आहे. त्यामुळे त्यांचे नेते काहीतरी बोलत सुटले आहेत. राज्यातील कॉंग्रेस नेत्यांमध्ये एकमेकांपेक्षा अधिक जलद कोण बोलू शकतो याविषयीच स्पर्धा लागली आहे. सुरुवातील कोण बोलते हे त्यांना कॉंग्रेसच्या दिल्ली दरबारी दाखवायचे आहे.
मध्यप्रदेशातील कॉंग्रेसचे नेते कमलनाथ यांचा मराठी मतदारांवर डोळा असून पांढुर्णा येथे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पुतळा बसवून त्याचे अनावरण आदित्य ठाकरेंच्या हस्ते करून ते केविलवाना प्रयत्न करीत आहेत. त्यापूर्वी त्यांनी त्यांच्याच लोकसभा मतदारसंघातील सौंसर येथील श्री शिवाजी महाराजांचा पुतळा का पाडला याचे उत्तर द्यावे, असा प्रश्न केला. डीपीसीचा निधी विरोधकांना दिला नाही
दरम्यान,उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या कार्यकाळात जिल्हा नियोजन समितीचा निधी विरोधी पक्षातील आमदार व लोकप्रतिनिधींना मिळू नये असा अलिखित आदेश काढला होता. त्यांनी आकसापोटी राजकारण केले. आता ते लोक निधीवाटपावर बोलत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे पालकमंत्री आहेत, त्यांनी डीपीसीमधून एक हजार कोटींचा निधी दिला आहे. या विकासनिधीचा योग्य वापर व्हावा, विविध योजना राबविल्या जाव्या, अशी आमची भूमिका आहे. यासाठी आज बैठक होत असल्याचे स्पष्ठ केले.
महिलांनी राजकारणात पुढे यावे ही भाजपची कायम भूमिका राहिली. त्यामुळेच भाजपामध्ये १५ लाखाहून अधिक महिला पदाधिकारी असून कॉंग्रेसने तब्बल १२ वेळा महिला आरक्षण कायदा संसदेतून परत पाठविला, कॉंग्रेस व उबाठा गटाकडे महिला नेतृत्त्वच नसल्याचा दावा केला. पवार साहेबांनी कुणालाही स्वतःपेक्षा मोठे होऊ दिलं नाही, भाजपमध्ये कार्यकर्ता आपल्यापेक्षा मोठा व्हावा ही नेत्याची भावना असते. महाविकास आघाडीला जेव्हा वाटतं आपण हरतो आहोत तेव्हा ते इतरांसमोर प्रश्नचिन्ह लावतात असा आरोप केला.













