अखेर दिल्लीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसबाबतचा निर्णय ठरला

0

राज्यात नेतृत्व बदल होणार नाही देवेंद्र फडणवीस हेच उपमुख्यमंत्री पदावर कायम राहतील, असा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतला. दिल्लीत भाजप मुख्यालयात महाराष्ट्र संदर्भात बैठक झाली. अमित शाह आणि जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सबसे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, चंद्रकांत दादा पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे आणि आशिष शेलार उपस्थित होते.

नवी दिल्ली येथे भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वासह भाजप महाराष्ट्राच्या कोअर टीमची बैठक झाली, ज्यामध्ये महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर चर्चा करण्यात आली, महायुतीतील घटक पक्षांसोबत आगामी विधानसभेची रणनीती यावर चर्चा करण्यात आली, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

महाराष्ट्राच्या निकालावर सविस्तर चर्चा केली. महाराष्ट्रात फक्त पॉईंट थ्री परसेंटचा फरक महायुती आणि महाविकासआघाडीच्या मतांमध्ये आहे. कुठे मतं मिळाली? कुठे मिळाली नाहीत. कुठे अडचणी आल्या, कोणत्या करेक्टिव्ह ऍक्शन घेतल्या पाहिजेत, यावर चर्चा झाली. विधानसभेच्या ब्लू प्रिंटवर चर्चा केली. केंद्रीय भाजप पूर्ण ताकदीने आमच्या मागे आहे. येत्या विधानसभेचा रोडमॅप यावरही आम्ही प्राथमिक चर्चा केली. कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीच्या सर्व घटकपक्षांसोबत ही विधानसभा कशी निवडून येता येईल. यासंदर्भातला रोडमॅप तयार केला आहे.

लवकरच घटकपक्षांसोबत चर्चा करून, अत्यंत मजबुतीने निवडणुकीत कसं पुढे जाता येईल, यासंदर्भातली कारवाई आम्ही येत्या काळात करणार आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

देवेंद्र फडणवीस लागले कामाला
नागपूर मधल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांची आढावा बैठक
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा पुढे केला. ते राजीनामा देण्यावर ठाम होते. पण दिल्लीत झालेल्या बैठकीत अखेर त्यांचे मन वळविण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले. त्यांचा राजीनामा नाकारण्यात आला असला तरी, एक मोठी जबाबदारी फडणवीस यांच्या खांद्यावर येऊन पडली आहे. दिल्ली दौऱ्यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा ॲक्शन मोडमध्ये दिसत आहेत. दिल्लीच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा न देता प्रशासनामध्ये राहूनच पक्ष संघटना मजबूत करावी अशा आशयाची चर्चा झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुंबईत परतताच आज नागपूर मधल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांची आढावा बैठक बोलावली. देवेंद्र फडणवीस यांनी मला सरकार मधून मोकळ करावं अशी भूमिका मांडली होती. मात्र भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांनी त्यांच्या भूमिकेला नकार दिला. तो निर्णय मान्य करत देवेंद्र फडणवीस पुन्हा कामाला लागले.

सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर निवड
अविरोध निवड झाल्याची घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाल्याची घोषणा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांनी केली आहे. राज्यसभा सदस्य प्रफुल्ल मनोहरभाई पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी (महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या) ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. त्यासाठी श्रीमती पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची राज्यसभेवर निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.

छगन भुजबळ यांना पुन्हा शिवसेनेत घेणार नाही
संजय राऊत यांनी स्पष्ट केली भूमिका

छगन भुजबळांबद्दल खोटा दावा करून मला वातावरण बिघडवायचे नाही. त्यांचा आणि ठाकरे गटाचा काहीही संपर्क झालेला नाही अशी स्पष्ट भूमिका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. तसेच ते आमच्या पक्षात टिकून राहिले असते तर आज मुख्यमंत्री झाले असते ते म्हणत त्यांनी परतीचे दार बंद केले.

भाजपचे नेते 288 मतदारसंघात दौरा करणार
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची माहिती
भाजपचे 48 नेते विधानसभेच्या 288 मतदारसंघात दौरा करणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. मंगळवारी भाजपची कोअर कमिटीची बैठक झाली. यांनतर आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्रीपदावर चर्चा नाही, मात्र फडणवीसच आमचे नेते, असल्याचे ते म्हणाले.

शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर
कोल्हापूरसह नांदेड, परभणी, धाराशिवमध्ये विरोध

‘एकच जिद्द – शक्तिपीठ महामार्ग रद्द’ अशा घोषणा देत कोल्हापूरसह नांदेड, परभणी, धाराशिवचे हजारो शेतकरी मंगळवारी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने केली. महामार्ग करण्याचा निर्णय रद्द होईपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर ते गोवा या शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत राज्य सरकारच्या दडपशाही धोरणाला कडाडून विरोध केला. सरकारने १२ जुलै पर्यंत महामार्गाला स्थगिती नव्हे तर रद्दचा निर्णय घ्यावा अन्यथा महामार्ग रोको करु, जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत रात्रंदिवस रस्त्यावरुन हलणार नसल्याचा इशारा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दिला.

राज्यात आजपासून पोलीस भरती सुरू
उमेदवारांमध्ये उच्चशिक्षित तरूण
राज्यभरात आज पोलीस भरतीला सुरुवात झाली असून एकूण 17000 जागेसाठी ही भरती होत आहे. दरम्यान पहाटेपासूनच विद्यार्थी भरतीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील विविध क्रीडा संकुल आणि मैदानांवर पोलीस भरती प्रक्रिया राबवली जात आहे. राज्यात आजपासून 17 हजार 471 पदांसाठी पोलीस भरती सुरू झाली आहे. राज्यातील विविध पोलीस भरती केंद्रांवर भरती प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. 17 हजार 471 पदांसाठी राज्यभरातून 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये उच्चशिक्षित तरूणांची संख्याही जास्त आहे.

नाना पटोले यांच्या विरोधात भाजपचं आंदोलन
कार्यकर्त्याने धुतले नाना पटोल यांचे पाय
नाना पटोले यांच्या विरोधात भाजपचं आंदोलन सुरु झालय. अकोला याठिकाणी आंदोलन सुरु आहे. नाना पटोले हे संत गजाजन महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. तेव्हा त्यांच्या पायाला चिखल लागला होता. अशात एका कार्यकर्त्याने नाना पटोल यांचे पाय धुतले… याच प्रकरणामुळे भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.

11 राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा
महाराष्ट्रात लवकरच दाखल होणार मान्सून
भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे की मान्सून पुढील 3-4 दिवसांत महाराष्ट्र, छत्तीसगड ओडिशा, किनारी आंध्र प्रदेश, उत्तर-पश्चिम बंगालचा उपसागर, बिहार आणि झारखंडमध्ये पोहोचू शकतो. त्याचबरोबर उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये तीव्र उकाडा जाणवत आहे. IMD ने उत्तर प्रदेश, दक्षिण उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, बिहार आणि जम्मू विभागातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. दुसरीकडे मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला असून येलो अलर्टचा इशारा देखील देण्यात आला आहे.