‘नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म’चा निर्णय ऐतिहासिक!

0

आ. संदीप जोशींनी केले पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचे स्वागत

नागपूर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स’चे आमदार संदीप जोशी यांनी अभिनंदन केले आहे. सर्वसामान्यांना दिलासा देणारा हा ऐतिहासिक निर्णय असून, नागरिकांसाठी हा खऱ्या अर्थाने बचत उत्सव आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी शनिवारी (21 सप्टेंबर) संध्याकाळी 5 वाजता देशाला उद्देशून केलेल्या संबोधनात ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. उद्या, 22 सप्टेंबरपासून म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून हे रिफॉर्म्स लागू होणार आहेत. नव्या सुधारणा म्हणजे नागरिकांसाठी ‘जीएसटी बचत उत्सव’ आहे. यामुळे प्रत्येक कुटुंबाच्या बचतीत वाढ होईल, गरीब, शेतकरी, महिला, युवक आणि मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळेल, असेही आमदार जोशी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानुसार, 99 टक्के वस्तूंवरील 18 टक्के जीएसटी आता 5 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. त्यामुळे अन्नधान्य, औषधे, साबण, विमा सेवा यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील. हॉटेल रूम भाडे कमी झाल्याने प्रवास खर्चातही बचत होणार आहे. तसेच 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न आयकरमुक्त केल्याने गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना दुहेरी लाभ मिळाला आहे. या निर्णयांमुळे देशातील नागरिकांच्या खिशात तब्बल 2.5 लाख कोटी रुपयांची बचत होईल, या निर्णयाचे आमदार जोशी यांनी स्वागत केले आहे.

‘आत्मनिर्भर भारत’च्या संकल्पनेशी हे रिफॉर्म्स जोडले गेले असून लघु व मध्यम उद्योग (MSME) हे देशाच्या प्रगतीचे कणा आहेत. त्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या व्यवसायाला नवे बळ मिळेल. 2014 पूर्वी कररचनेतील गुंतागुंत संपुष्टात आणत ‘वन नेशन-वन टॅक्स’ची अंमलबजावणी केली, त्याचेच हे पुढचे पाऊल असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी नमूद केल्याचे सांगत हा निर्णय ऐतिहासिक असल्याचा उल्लेख आमदार जोशी यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे.